नागरिकांना रेड अलर्ट
सखल भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- हवामान विभागाने जिल्ह्यात 11 ते 14 जुलै या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मागील तीन दिवसापासून संततधार कोसळणारा पाऊस पुढील तीन दिवस रौद्ररुप धारण करणार असल्याने हवामान खात्याने धोक्याचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातून वाहणार्या गोदावरी नदीत नांदूरमधमेश्वर बंधार्यातून 27 हजार 868 व भीमा नदीत दौंड पूल येथे 23 हजार 819 क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.
ही वस्तूस्थिती लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे जिल्ह्यातील नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सकल भागात राहणार्या नागरिकांना तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
जिल्ह्यात आज पर्यंत 166.3 मीमी (37.1%) पर्जन्यमान झालेले आहे. जिल्ह्यातून वाहणार्या गोदावरी नदीस नाशिक जिल्ह्यातील विविध धरणाद्वारे सोडलेले विसर्गामुळे नांदूरमधमेश्वर बंधार्यातून 27 हजार 868 तसेच भीमा नदीस पुणे जिल्ह्यात झालेल्या पर्जन्यमानामुळे दौंड पूल येथे 23 हजार 819 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यास धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होऊन पर्यायाने नदी पात्रातील विसर्गात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.
नागरिकांनी नदीपात्र, तसेच ओढे व नाल्यापासून दूर राहावे किंवा सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे, नाल्यांवरील पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये, जुना मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये, अतिवृष्टीमुळे भूस्खल होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्या दृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणार्या लोकांनी दक्षता घ्यावी. वेळीच सुरक्षा स्थळी स्थलांतर करावे. धरण व नदी क्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणार्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या पाण्याच्या प्रवाहात उतरू नये. अचानक नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास जीवितास धोका उद्भवू शकतो. धोकादायक ठिकाणी चढू अथवा उतरू नये. मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.