• Thu. Dec 12th, 2024

सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या दुरावस्थेने नागापूरला महिलांना उघड्यावर बसण्याची नामुष्की

ByMirror

Feb 8, 2022

आरपीआय महिला आघाडीच्या वतीने महापालिकेत निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिका हद्दीतील नागापूर भागात असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून, स्थानिक महिलांना स्वच्छतागृह नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. स्वच्छतागृह दुरुस्तीसाठी स्थानिक महिलांनी थेट महापालिका गाठून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने मनपा उपायुक्त यशवंत डांगे व शहर अभियंता सुरेश इथापे यांना निवेदन दिले. यावेळी आरपीआयच्या महिला शहराध्यक्षा ज्योती पवार, शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, विजय शिरसाठ, संतोष पाडळे, मंगल चांदणे, सविता पाटोळे, मयुरी ठोंबे, अनिता पाडळे, बबई वाघमारे, सिमा काते, कोमल भाकरे, सोनी पवार, शोभा मिरपगार, दिपाली सुर्यवंशी, मंगल गायकवाड आदी महिला उपस्थित होत्या.
नागपूर भागामध्ये दहा सार्वजनिक शौचालय आहे. पण बर्‍याच वर्षापासून सर्व शौचालयाची दुरवस्था झाली आहे. स्वच्छतागृहाला दार, लाईट व पाण्याची व्यवस्था नसल्याने स्थानिक नागरिकांसह महिलांना तेथे जाण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. सर्व परिस्थितीचा सामना करत महिलांना नाईलाजाने उघड्यावर शौचास बसावे लागत आहे. महिला गरोदर अवस्थेत असेल, तर मोठी अडचण निर्माण होत आहे. पावसाळ्यात तर अनेक महिला शौचास जाताना पाय घसरून पडल्या आहेत. स्वच्छालयाला जाणार्‍यांची संख्या जास्त असल्यामुळे व शौचालय वापरण्यासारखे नसल्याने या भागामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
केंद्र व राज्य सरकार उघड्यावर शौचालय करू नये, यासाठी खबरदारी घेऊन विविध योजना राबवित आहे. परंतु शहरातील नागपूर भागांमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याने नागरिकांना नाईलाजाने उघड्यावर बसण्याची नामुष्की ओढवली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. या भागातील स्वच्छतागृहाची दुरुस्ती करुन दरवाजे, लाईट व पाण्याची सोय करुन देण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर प्रश्‍न येत्या आठ दिवसात मार्गी न लागल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने महापालिकेसमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *