अध्यक्षपदी पवन धूत व सचिवपदी कृष्णा भुतडा यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- सारसनगर माहेश्वरी समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यामध्ये नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी पवन धूत व सचिवपदी कृष्णा भुतडा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
प्रारंभी महेश भगवानचे पूजन करुन बैठकीला प्रारंभ करण्यात आले. दिवंगत झालेल्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. समाजाची ही बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी उपाध्यक्षपदी सुयोग झंवर व विशाल बाहेरी (बाहेती) तर सहसचिवपदी अमित जाखोटिया यांची नियुक्ती करण्यात आली. या नवीन कार्यकारणीची निवड पुढील दोन वर्षासाठी करण्यात आली आहे.
संस्थेचे कोषाध्यक्ष संजय कालाणी यांनी सन 2021 चे ताळेबंद सादर केले. माजी अध्यक्ष अजय नागोरी यांनी मागील दोन वर्षात केलेल्या कामकाजाचा लेखाजोखा मांडून, राबविण्यात आलेल्या सामाजिक कार्याचा अहवाल सादर केला. सारसनगर माहेश्वरी समाजातर्फे रामदेव भक्त मंडळ यांना मंदिर उभारणीसाठी 1 लाख 11 हजार 111 रुपयाची देणगी देण्यात आली. नूतन अध्यक्ष पवन धूत यांनी सारसनगर माहेश्वरी समाजाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी मावळते सचिव विशाल बाहेती यांनी उपस्थितांचे आभार मानले. सर्वसाधारण सभेच्या यशस्वीतेसाठी सर्व कार्यकारी मंडळाने परिश्रम घेतले.