ढासाळलेले निसर्गाचे समतोल वृक्षरोपणाने साधले जाणार -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी निमगाव वाघा (ता. नगर) ते नेप्ती 2 कि.मी. अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा एक हजार झाडांची लागवड करण्यात आली. या अभियानाची सुरुवात ग्रामपंचायत सदस्य तथा वृक्षमित्र पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते रोपांचे पूजन व वृक्षरोपणाने करण्यात आली. यावेळी वनरक्षक अफसर पठाण, डॉ. विजय जाधव, अरुण काळे, शब्बीर शेख, संतोष रोहोकले, जनाबाई रोहोकले, मंगल गायकवाड, संगिता जाधव, लक्ष्मी चारुडे, शब्बीर शेख, संदिप डोंगरे आदी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, वृक्षरोपण व संवर्धनाने पर्यावरणाचे समतोल साधले जाणार आहे. रस्त्यांच्या दुतर्फा लावलेली झाडे उन्हाळ्यात विसावा देतात, तर पर्यावरणाचे समतोल देखील साधतात. उन्हाळ्यात दिवसंदिवस तापमान वाढत असून, ढासाळलेले निसर्गाचे समतोल वृक्षरोपणाने साधले जाणार आहे. धरणी मातेला हिरवाईचे पुनर्वैभव प्राप्त करुन देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे त्यांनी आवाहन केले. वनरक्षक अफसर पठाण यांनी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने पावसाळ्यात झाडे लावून त्याच्या संवर्धनासाठी तीन वर्ष काळजी घेतली जाते. ग्रामीण भागात मोठ्या संख्येने जगविण्यात आलेल्या झाडांची त्यांनी माहिती दिली.
सामाजिक वनीकरण परिक्षेत्र अहमदनगर अंतर्गत पर्यावरण संवर्धनासाठी पावसाळ्यात दरवर्षी विविध ठिकाणी झाडे लावली जातात. यावर्षी वनक्षेत्रपाल दिलीप जिरे यांच्या मार्गदर्शनाखाली निमगाव वाघा ते नेप्ती 2 कि.मी. रस्त्याच्या दुतर्फा एक हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे.