फक्त शिक्षणावर खर्च न करता, पालकांनी जबाबदारीने मुलांना घडविण्यासाठी मैत्रीपूर्ण साथ द्यावी -के. बालराजू
बारावीतील गुणवंत विद्यार्थी व आयआयटी मद्रास येथे निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा बॅण्डबाजासह विशेष गौरव
अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाने मुलांच्या अभ्यासात दोन वर्षाचा खंड पडून मोठे नुकसान झाले आहे. हे सातत्य पुन्हा निर्माण करण्यासाठी शिक्षकांना मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. आज मुलांसाठी पालकांनी केलेली क्रिया मुलांच्या उज्वल भवितव्याची प्रतिक्रिया राहणार आहे. मुलांच्या शिक्षणावर जुगारप्रमाणे पैसे खर्च न करता मोठ्या जबाबदारीने त्यांना घडविण्यासाठी मैत्रीपूर्ण साथ देण्याचे आवाहन सांदिपनी अकॅडमीचे व्यवस्थापकीय संचालक के. बालराजू यांनी केले.
पाईपलाइन रोड येथील मौर्या मंगल कार्यालयात जेईई, नीट तसेच इतर स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थी घडविणार्या सांदिपनी अकॅडमीच्या वतीने पालक मेळावा घेऊन विद्यार्थ्यांच्या भविष्यातील वाटचाल या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तर बारावी बोर्डातील गुणवंत विद्यार्थी व आयआयटी मद्रास येथे निवड झालेला सार्थक साबळे या विद्यार्थ्यांचा बॅण्डबाजासह विशेष गौरव करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना के. बालराजू बोलत होते. याप्रसंगी अकॅडमीचे संचालक अमित पुरोहित, नानासाहेब बारहाते, राहुलकुमार गुजराल, मनीष कुमार आदींसह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे के. बालराजू म्हणाले की, प्रत्येक मुलांची बौद्धिक क्षमता वेगवेगळी आहे. त्यांच्या शिक्षणाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्या पध्दतीने त्यांना पुढे घेऊन जावे लागणार आहे. पालकांनी आपल्या मुलांची तुलना इतरांशी न करता त्यांचे मार्गदर्शक होऊन त्यांच्या यशात सहभाग घेण्याचे सांगितले. तर पालकांची मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी असलेली जबाबदारी विशद केली.
या पालक मेळाव्यात बारावी बोर्डाच्या परीक्षेत गणित मध्ये टॉप करणारे मानसी शिंदे (97), टिळक भंडारी (97), अभिजीत हापसे (96), तेजस कावरे (96), हर्ष जैन (95), हर्षवर्धन दोमल (95), ओम इंगळे (95), कल्याणी बारगळ (95), समृध्दी कटारिया (93), शुभम मोरे (91), फिजिक्स मध्ये टॉप प्रज्ञा जगधने (90), हर्ष जैन (90), दिव्या चितळ (88), समृध्दी कटारिया (86), सुधांशू रक्ताटे (85), शुभम कराळे (84), पूर्वा शिंदे (84), केमिस्ट्री मधील टॉप प्रज्ञा जगधने (92), टिळक भंडारी (92), आयुष भाळवणकर (86), मानसी शिंदे (85), शुभम कराळे (84), समृध्दी कटारिया (84) यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अकॅडमीत विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येणारे दैनंदिन उपक्रम, सराव सत्र, अभ्यासाचे नियोजन, योगा, एकाग्रतेसाठी ध्यान, रट्टा मारून शिक्षण न देता गुणात्मक पध्दतीने दिले जाणारे शिक्षण, महाविद्यालयातील प्रवेश, वाहतूक व्यवस्था आदींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.