सरपंच परिषदेचे जिल्हा परिषदे समोर फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष
घराणेशाही संपुष्टात येऊन काम करणार्यांना संधी मिळेल -आबासाहेब सोनवणे
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात सरपंच आणि नगराध्यक्षांची निवड ही थेट जनतेतून होण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयाचे महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद मुंबईच्या वतीने स्वागत करण्यात आले. तर जिल्हा परिषदे समोर फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. सरपंचाची निवड जनतेमधून होण्याची आग्रही मागणी सरपंच परिषदेने नव्याने सत्तेवर आलेल्या सरकारकडे लावून धरली होती. राज्यातील 50 हजारांहून अधिक सरपंचांनी एकमुखानं सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याची स्पष्ट केले होते. अखेर या मागणीला यश आले आहे.
या जल्लोष प्रसंगी सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पठारे, नगर तालुका सचिव पै. नाना डोंगरे, सारोळा कासारचे उपसरपंच जयप्रकाश पाटील, नगर तालुका महिला अध्यक्षा अॅड. अनुजा काटे, भोयरे पठारचे सरपंच बाबासाहेब टकले, चिचोंडी पाटीलचे सरपंच मनोज कोकाटे, धनगर वाडीचे सरपंच किशोर शिकारे, बुरुडगावचे माजी सरपंच बापू कुलट, देवगावचे सरपंच कविता कदम, खातगावचे सरपंच मिठू कुलट, कोल्हेवाडीचे उपसरपंच पोपट शेळके, नादगावचे सरपंच सुनिता सरक, गुंडेगावचे सरपंच संतोष भापकर, पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर, मांडव्याचे माजी सरपंच पोपट निमसे, बुर्हाणनगरचे सरपंच रावसाहेब कर्डिले, रामसिंग मेजर आदी उपस्थित होते.
राज्यात 27 हजार 800 पेक्षा अधिक ग्रामपंचायती आहेत. ग्रामीण भागाचे लोकहित लक्षात घेऊन गटातटाचे, भावकीचे आणि जातीयवादाचे राजकारण संपविण्यासाठी पुन्हा थेट जनतेतूनच सरपंचाची निवड करण्याची मागणी सरपंच परिषदेने करुन पाठपुरावा सुरु ठेवला होता. थेट जनतेतून सरपंच निवड होण्याचा कायदा सन 2017 साली विधिमंडळात पारित करण्यात आला होता. तो आघाडी सरकारने 2019 मध्ये रद्द केला. त्या विरोधात सरपंच परिषदने आक्रमक भूमिका घेतली. परंतु तत्कालीन सत्ताधार्यांनी याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र नव्याने सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा हा निर्णय घेतल्याने सरपंच परिषदेने सरकारचे आभार मानले आहे. तसेच सरपंच परिषदेने ग्रामपंचायतचे ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे वीज बिल व ग्रामपंचायतचे पथदिव्यांचे वीज बिलचा प्रश्न सातत्याने लावून धरला होता. हा प्रश्न देखील नवीन सरकारने सोडवून सदर वीज बिल शासन भरण्याचे निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दल सरकारचे आभार मानण्यात आले.
जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे म्हणाले की, सरपंच परीषदेने महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाचा एक निर्णायक लढा जिंकला आहे. आता गावातील गटतट संपुष्टात येऊन, गाव विकासात्मक दिशेने प्रगतीकडे भरारी घेईल. सर्वसामान्य कष्टाळू व प्रामाणिक नेतृत्व उदयास येतील. घराणेशाही संपुष्टात येऊन काम करणार्यांना संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चौका-चौकात सरपंच परिषदेच्या पदाधिकार्यांचे सत्कार
महाराष्ट्रात सरपंच निवड थेट जनतेतून होण्यासाठी निर्णायक भूमिका घेऊन राज्य सरकारकडे यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल पटर्वधन चौकात सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे व नगर तालुका सचिव पै. नाना डोंगरे यांचा सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे, हरियालीचे सुरेश खामकर यांनी सत्कार केला.