महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद आग्रही
सोमवारी जिल्हाधिकारी मार्फत राज्य सरकारला दिले जाणार निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामपंचायत मध्ये सरपंच थेट जनतेमधून निवडून देण्याचा क्रांतीकारक निर्णय पुन्हा महाराष्ट्रात राबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद मुंबई आग्रही आहे. या मागणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सरपंच परिषदेच्या वतीने आग्रही मागणी करण्यात येत असल्याची माहिती सरपंच परिषदेचे नगर तालुका सचिव पै. नाना डोंगरे यांनी दिली.
या पार्श्वभूमीवर नगर तालुका सरपंच परिषदेच्या वतीने सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (दि.11 जुलै) सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी व तहसिलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे. यासाठी प्रारंभी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सर्व पदाधिकारी व सदस्यांना एकत्र येण्याचे आवाहन नांदगाव सरपंच सुनिता सरक, निंबोडी सरपंच शंकर बेरड, पिंपरी सरपंच रभाजी सुळ, पोखर्डी सरपंच रामेश्वर निमसे, माजी उपसरपंच महेंद्र शेळके, आगडगाव सरपंच मच्छिंद्र कराळे, इसळक सरपंच छाया गेरंगे, कापूरवाडी सरपंच संभाजी भगत, खडकी सरपंच प्रविण कोठुळे, बहिरवाडीचे सरपंच अंजना येवले, बुरुडगाव सरपंच अर्चना कुलट, भोयरे पठार सरपंच बाबा टकले, इमामपूर सरपंच भिमराज मोकाटे, रुईछत्तीसी सरपंच विलास लोखंडे, वाळकी सरपंच स्वाती बोठे, वडगाव सरपंच विजय शेवाळे, जेऊर सरपंच राजश्री मगर, नगर तालुका महिला अध्यक्षा अनुजा काटे यांनी केले आहे.
महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या सत्ता काळात जनतेमधून सरपंच निवडीचा घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. सध्या महाराष्ट्रात नवीन सरकार आले असून, या सरकारकडून सरपंच थेट जनतेतून निवडावा अशी मागणी जोर धरु लागली आहे. यासाठी सरपंच परिषदेने पुढाकार घेतला असून, जनतेमधून सरपंच निवडला गेल्यास घोडे बाजार थांबून खर्या अर्थाने ग्रामीण भागाला न्याय मिळणार असल्याची भूमिका सरपंच परिषदेने घेतली असल्याचे डोंगरे यांनी म्हंटले आहे.