सार्वजनिक मालमत्तेबाबत अनागोंदी असल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात अनेक ठिकाणी सरकारी मालकीच्या कोट्यावधी किंमतीच्या जागा पड असून, त्याचे योग्य नियोजन व वापर होत नसल्याचा निषेध नोंदविण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने सरकारी स्थावर मालमत्तेचा प्रजासत्ताक सत्यबोधी सूर्यनामा केला जाणार असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक अॅड. कारभारी गवळी यांनी दिली. लोकशोषक असलेल्या लोकसेवकांना कायमचा धडा शिकवण्यासाठी व ही बाब जनतेच्या लक्षात आणुन देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून जुने जिल्हाधिकारी कार्यालया समोर दि.31 मार्च रोजी हे आंदोलन केले जाणार आहे.
देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे. परंतु देशात भ्रष्टाचार आणि अनागोंदी सर्वत्र आढळून येते. जिल्हाधिकारी कार्यालय दोन महिन्यापूर्वी स्थलांतरित झाले. परंतु जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारती राज्य सरकारच्या इतर कार्यालयांना देण्याबाबत काहीएक कारवाई करण्यात आलेली नाही. शहरात राज्य सरकारची अनेक कार्यालये भाड्याच्या जागेतून कामे करतात. त्यासाठी लाखो रुपये भाडे दिले जाते. अप्रत्यक्ष रीतीने याचा बोजा करदात्यांवर पडतो. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने त्याची दखल देखील घेतलेली नाही. या आंदोलनात जुने जिल्हाधिकारी कार्यालयातील पडून ठेवल्या इमारतीबाबत सार्वजनिक मालमत्तेबाबत अनागोंदी असल्याबाबतचा निर्णय घोषित केला जाणार आहे.
यावरुन केंद्र किंवा राज्य सरकारच्या सार्वजनिक मालमत्ताबाबत सरकारी यंत्रणा फारशी गंभीर नाही, याची तमाम जनतेला प्रचिती आलेली आहे. एमआयडीसी मध्ये 20 एकर जमिनीवर सरकारी दूध डेअरी सुरू होती. परंतु गेली दहा ते पंधरा वर्षे ही डेअरी मोडून पडलेली आहे. सदरची 20 एकर जमीन पडून आहे. त्यातील कोट्यावधी रुपयांच्या इमारती निकामी पडून आहेत.
सार्वजनिक मालमत्तेबाबतची अनागोंदी,रस्त्यांचे निकृष्ट काम, खड्डयाने भरलेले रस्ते, शाळेच्या पडक्या आणि धोकादायक इमारती आणि सरकारी जमिनीवर झालेली अतिक्रमणे यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. कॉन्टम फिजिक्स मधील ऑब्झर्वेशन इफेक्ट तंत्रानुसार शासन प्रशासनावर जनतेचे लक्ष ठेवल्यावर त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल घडून येतो, असा अनुभव आहे. सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यामध्ये मदमस्त झालेले लोकसेवकांना कर्तव्याची जाणीव करुन देण्यासाठी, शासन प्रशासनातील भ्रष्टाचार आणि अनागोंदी देशातील जनतेसमोर आणण्यासाठी प्रजासत्ताक सत्यबोधी सुर्यनामा हा एकमेव मार्ग असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. आंदोलनाबाबतची नोटीस संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री, महापालिका आयुक्त व पोलीस अधीक्षकांना पाठविण्यात आली आहे. या आंदोलनासाठी अॅड. गवळी, अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे, वीरबहादूर प्रजापती, प्रकाश थोरात, हिराबाई ग्यानप्पा, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.