बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर करणार निदर्शने
अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने 23 व 24 फेब्रुवारी रोजी लाक्षणिक संपाची हाक देण्यात आली असून, जिल्ह्यातील सरकारी व निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संपावर जाणार आहेत. नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी सरकारचे लक्ष वेधण्यात करिता संप पुकारण्यात आला आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील हजारो कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याची माहिती समन्वय समितीचे निमंत्रक रावसाहेब निमसे यांनी दिली.
मार्च 2020 पासून कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्याचे अर्थगती मंदावली आहे. तरीसुद्धा याच कालावधीत कर्मचारी व शिक्षकांनी जिवाची बाजी लावून कर्तव्य पार पाडली. मुख्यमंत्री व मुख्य सचिव पातळीवर चर्चा व्हावी म्हणून समन्वय समितीने आग्रहाचे प्रयत्न केले होते. परंतु अद्याप शासनाने साधे चर्चेलाही बोलावले नाही. त्यामुळे सर्व कर्मचारी मध्ये संतापाचा सूर असून, तो व्यक्त करण्यासाठी समन्वय समितीच्या आदेशानुसार 23 व 24 फेब्रुवारी रोजी दोन दिवसाचा लाक्षणिक संप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्व कर्मचारी व शिक्षक यांनी बुधवार दि.23 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजता नवीन जिल्हाधिकारी कार्यालय जवळ मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. समन्वय समिती मधील राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामसेवक, महानगरपालिका, जिल्हा परिषद कर्मचारी यांनी एकच मिशन जुनी पेन्शन या मागणीकरिता आपली शक्ती दाखवण्यासाठी प्रचंड संख्येने या संपात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.