• Wed. Dec 11th, 2024

सय्यद फकीर मोहंमद शाह चिश्ती (रहे.) दर्गाचा संदल उरुस उत्साहात

ByMirror

Feb 12, 2022

कोरोनाचा नायनाट व देशात सुख, शांती आणि समृध्दतेसाठी प्रार्थना

अहमदनगर (प्रतिनिधी)- लालटाकी येथील हजरत ख्वाजा सय्यद फकीर मोहंमद शाह चिश्ती (रहे.) दर्गाच्या संदल-उरुस बज्म ए चिरागे फकीर चिश्ती इंटरनॅशनल (बी.सी.एफ.आय.) संस्थेच्या वतीने शुक्रवारी (दि.11 फेब्रुवारी) उत्साहात साजरा करण्यात आला. विविध धार्मिक कार्यक्रमांनी पार पडलेल्या ऊरुसनिमित्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सज्जादा नशीन हजरत सय्यद मोहसीन अली शाह चिश्ती यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव सोहळा पार पडला. पारंपारिक वाद्यांवर धार्मिक गीतांचे सादरीकरण झाले. उपस्थित भाविकांच्या हस्ते दर्गावर फुलांची चादर अर्पण करण्यात आली. तर कोरोनाचा कायमचे नायनाट होण्यासाठी व देशात सुख, शांती आणि समृध्दतेसाठी सामुदायिक प्रार्थना करण्यात आली. दर्गावर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई सर्वांचे लक्ष वेधुन घेत आहे. संदल, उरुस निमित्त शनिवारी (दि.12 फेब्रुवारी) भाविकांसाठी भंडार्‍याचे आयोजन करण्यात आले होते. तर संध्याकाळी झालेल्या मुशायरा कार्यक्रमात श्रोते मंत्रमुग्ध झाले. रविवारी रात्री दर्गा परिसरात महफिले समा कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हजरत फकीर मोहंमद शाह सहाब हे मोहंमद पैगंबर साहेबांचे वंशज असून, त्यांचे पुर्वज हजरत सय्यद आमिनुल मदनी हे मदीना शरीफ अरबस्तान येथून भारतात स्थायिक झाले. हजरत फकीर मो.शाह सहाब यांचा जन्म अहमदनगर येथे झाला. त्यांनी पंचवीस वर्ष पीरशहाखुंट येथील मस्जीदमध्ये इमामत केली. झेंडीगेट येथे खानकाह मदरसेची स्थापना करुन, त्यांनी विद्यार्थ्यांना इस्लाम धर्माची शिकवण दिली. त्यांचे गुरु सय्यद हबीबअली शाह चिश्ती निजामी असून, त्यांची दर्गाह नामपल्ली (हैदराबाद) येथे आहे. हजरत फकीर मो.शाह सहाब यांनी सुफी पंथामधील चिश्तीया निजामी या परंपरेची दिक्षा सय्यद हबीबी अली शाह यांच्याकडून घेतली. या परंपरेचा प्रचार व प्रसार देशासह परदेशात केला गेला. ज्या प्रमाणे हजरत साहेबांनी अहमदनगर मध्ये खानकाह ची स्थापना केली, त्याप्रमाणे त्यांचे नातू हजात सय्यद मेहबुब अली शाह चिश्ती निजामी यांनी प्रभावीपणे देश-विदेशात खानकाची स्थापना केली. हे संदल उरुस धार्मिक एकतेचे प्रतिक असून, खानकाहमधून मानवतेचा संदेश देण्यात येतो. या सुफी-संतांच्या परंपरेची जगाला गरज असल्याचे खानकाहचे व्यवस्थापन पहाणारे सज्जादा नशिन हजरत सय्यद मोहसीन अलीशाह सहाब यांनी सांगितले. हा संदल उरुस सोहळा कोरोना नियमांचे पालन करुन पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *