समाजाची प्रगती व स्थैर्य निर्माण होण्याच्या दिशेने वाटचाल करावी -शरद क्यादर
अहमदनगर(प्रतिनिधी)- पारंपारिक उद्योगधंद्यात मोठ्या प्रमाणात बदल झाला असून, बहुजन समाजाला बदलत्या काळानुरुप उद्योगधंद्याची कास धरावी लागणार आहे. समाजाची प्रगती व स्थैर्य निर्माण होण्याच्या दिशेने वाटचाल करावी लागणार आहे. युवकांना रोजगार मिळण्यासाठी शिक्षणाबरोबर व्यावसायिक प्रशिक्षण काळाची गरज बनली असून, या दृष्टीकोनाने श्री मार्कंडेय विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी शासकीय मान्यताप्राप्त व्यावसायिक प्रशिक्षण कोर्स उपलब्ध करुन देणार असल्याचे प्रतिपादन पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ विश्वस्त शरद क्यादर यांनी केले.
पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाच्या माध्यमातून समाजाच्या विकासासाठी व शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल श्री मार्कंडेय विद्यालयाच्या वतीने क्यादर यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या 75 अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त गांधी मैदान येथे गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सत्काराला उत्तर देताना क्यादर बोलत होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विलास पेद्राम, अ.भा. पद्मशाली धर्मशाळेचे (पंढरपूर) चंद्रकांत मिठापेल्ली, प्रमिला क्यादर, सामाजिक कार्यकर्त्या भूमय्या मिठापेल्ली, अरुण अमृतवाड, सचिव डॉ. रत्ना बल्लाळ, खजिनदार जयंत रंगा, विश्वस्त शंकर सामलेटी, राजेंद्र म्याना, कस्तूरबा महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा वैशाली नराल, सचिव पॉल भिंगारदिवे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना क्यादर म्हणाले की, कोरोनानंतर सर्वसामान्यांचा हिरावलेला रोजगार, आर्थिक प्रश्न व महागाईमुळे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवण्यासाठी व अद्यावत शिक्षण देण्यासाठी शिक्षकांना मोठे योगदान द्यावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात मुख्याध्यापक दीपक रामदिन म्हणाले की, शरद क्यादर यांनी विविध पदे भूषवून सामाजिक योगदान दिले. शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य कामगार वर्गाला अद्यावत शिक्षण देण्यासाठी डिजिटल वर्ग, ई-लर्निंगला भर देऊन गुणवंत विद्यार्थी घडविण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. पाहुण्यांचा परिचय प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीनिवास मुत्त्याल यांनी करून दिला. मानपत्राचे वाचन प्रमोद चन्ना यांनी केले. कलाशिक्षक नंदकुमार यन्नम यांनी क्यादर यांचे रेखाचित्रण करुन त्यांना भेट दिले.
विलास पेद्राम म्हणाले की, संघर्षमय जीवन जगून शरद क्यादर यांनी समाजाची सेवा केली. समाजाच्या भल्यासाठी सर्व विरोध झुगारुन आपली वाटचाल पुढे ठेऊन शिक्षण संस्थेला दिशा दिली. अनेकांना उभे करण्याचे व गोरगरीबांना आधार देण्याचे कार्य त्यांनी केले असल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रकांत मिठापेल्ली यांनी राजकारणचा धंदा न करता, क्यादर यांनी समाजाला त्यांनी विकासात्मक दिशा दिली. संवेदनशीलतेने त्यांचे सुरु असलेले कार्य दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. पॉल भिंगारदिवे यांनी कस्तूरबा महिला प्रतिष्ठानच्या वतीने मार्कंडेय विद्यालयात सुरु करण्यात येणारे विविध शासकीय कोर्सची माहिती दिली. उपस्थित पाहुण्यांनी नूतनीकरण करण्यात आलेल्या शाळेच्या ग्रंथालयास भेट दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. संतोष यादव यांनी केले. आभार जयश्री मेहेर यांनी मानले. यावेळी श्रमिकनगर मार्कंडेय विद्यालयाचे मुख्याध्यापक शशीकांत गोरे, ग्रंथपाल विष्णू रंगा, उपमुख्याध्यापक पांडुरंग गोने, पर्यवेक्षिका सरोजिनी रच्चा, शिक्षक प्रतिनिधी प्रा. भानुदास बेरड आदींसह शालेय अध्यापक, प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीकरण्यासाठी शालेय सेवकांनी परिश्रम घेतले.
मार्कंडेय शाळेत शरद शिष्यवृत्ती योजना जाहीर
दरवर्षी पाच गरजू घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांचा सर्व खर्च शरद शिष्यवृत्ती मधून केला जाणार असून, या शिष्यवृत्तीसाठी आर्थिक पाठबळ शरद क्यादर यांचे राहणार आहे. गरजू घटकातील गुणवंत मुलांना चांगल्या पध्दतीने शिक्षण घेता यावे, या उद्देशाने ही शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे.