अहमदनगर (प्रतिनिधी)- गरजू घटकांना आधार देण्याचे कार्य अजीजभाई सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने सुरू आहे. कोरोनामुळे आर्थिक गणित विस्कटले असताना, अशा शिबिरांचा सर्वसामान्यांना लाभ होत आहे. समाजकारण केल्याशिवाय राजकारणात यश नाही. राजकारणात येणार्या नवीन युवकांनी वंचितांचे प्रश्न सोडवून, सामाजिक कार्य केल्यास त्यांचे भविष्य उज्वल आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केले. तर अकलाख शेख यांच्या राजकीय व सामाजिक वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.
हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठान व सिटीकेअर रुबी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील गरजू घटकांसाठी झेंडीगेट, नालसाहब चौक येथे मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी माजी मंत्री कर्डिले बोलत होते. यावेळी उपमहापौर गणेश भोसले, अस्थिरोग तज्ञ डॉ. संदीप सुराणा, मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख, भिंगार कॅम्पचे सहा. पो.नि. शिशिरकुमार देशमुख, माजी समाजकल्याण अधिकारी रफिक मुन्शी, घर घर लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, नगरसेवक मुदस्सर शेख, दादू सुभेदार, पत्रकार विजयसिंह होलम, सलाउद्दीन सुभेदार, मुस्तफाखान, डॉ. रिजवान अहमद, अकलाख शेख, किरण बोरुडे, रियाज सय्यद, जालिंदर बोरुडे, अकलाख शेख, जुनेद शेख आदी उपस्थित होते.
डॉ. संदीप सुराणा यांनी पत्रकार कुटुंबातून आलो असल्याने सामाजिक प्रश्नांची जाणीव आहे. हाडांची झीज झाल्याने पाठ दुखी व इतर हाडांचे आजार उद्भवतात. शरीरात कॅल्शियम योग्य प्रमाणात असल्यास हाडांचे विकार उद्भवत नाही. कॅल्शियमची योग्य वेळी तपासणी केल्यास निरोगी जीवन जगता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. विजयसिंह होलम यांनी हाजी अजीजभाई यांच्या सामाजिक वारसा त्यांच्या मुलांसह त्यांचे नातू पुढे चालवत असल्याचे सांगून, प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध सामाजिक कार्याची त्यांनी माहिती दिली. रफिक मुन्शी यांनी हाजी अजीजभाई यांच्या सामाजिक कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. शिशिरकुमार देशमुख यांनी एखादे वाहन नवीन घेतल्यानंतर त्याची काळजी घेतली जाते. मात्र अमूल्य अशा शरीराची काळजी घेण्यास वेळ दिला जात नाही. व्याधीचे निदान वेळेवर झाल्यास निरोगी जीवन जगता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की, बाजारपेठेत गोरगरीब असंघटित कामगारांना मन्सूरभाई यांनी पाठबळ दिल्याने अनेक युवक आपला उदरनिर्वाह करीत आहे. गरजू घटकांना आधार देऊन अजीजभाईंचा सामाजिक वारसा असाच पुढे सुरू रहाण्याची अपेक्षा व्यक्त करुन, शहरात महापालिकेच्या माध्यमातून वृक्षरोपण, स्वच्छता व एलईडी पथदिव्यांबद्दल सुरु असलेल्या कार्याची माहिती दिली.
अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठानचे अकलाख शेख यांचा पुढाकारातून घेण्यात आलेल्या शिबीरात मोठ्या संख्येने रुग्णांचे कॅल्शियम, मधुमेह आदी आरोग्याशी निगडीत तपासण्या करण्यात आल्या. या शिबीरास नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. या शिबीरास आमदार संग्राम जगताप व नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी कैलाश नवलानी, मोहसीन शेख, नवेद शेख, सरफराज शेख, अज्जू शेख, असद इराणी, मोहंमद इराणी, मुस्तफा खान, शोएब खान, जावेद शेख, शफी सय्यद, बबलू सुभेदार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका धारवाले यांनी केले. आभार आफताब शेख यांनी मानले. शिबीर यशस्वी करण्यासाठी नविद शेख, रमीज शेख, समीर शेख, अदनान शेख, मुन्तझीम पठाण यांनी परिश्रम घेतले