डोंगरे बहुद्देशीय संस्था, नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण वाचनालयाचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेस शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
निमगाव वाघा येथील नवनाथ विद्यालयात चित्रकला स्पर्धा पार पडली. इयत्ता पाचवी ते सातवी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेसाठी छत्रपती संभाजी महाराज व्यक्तीचित्र, महाराष्ट्रातील गड-किल्ले व संभाजी महाराजांचा पराक्रम हे विषय देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी एकाहून एक हुबेहूब चित्र रेखाटले होते. यामध्ये प्रथम- हर्षदा संतोष शिंदे, द्वितीय- अनुष्का कैलास जाधव, तृतीय- ओमकार रामदास चौरे यांनी बक्षिसे पटकाविली. कला शिक्षक उत्तम कांडेकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
डोंगरे बहुद्देशीय संस्था, नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण वाचनालयाच्या वतीने दरवर्षी महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांनी साजरी केली जाते. कोरोनाच्या दोन वर्षात मुलांसाठी प्रत्यक्ष स्पर्धा आणि उपक्रम घेता आले नाही. मात्र निर्बंध शिथील झाल्याने ही स्पर्धा घेण्यात आली. संभाजी महाराजांचे कार्य व स्वराज्यासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाचा इतिहास विद्यार्थ्यांना ज्ञात होण्यासाठी आणि त्यांचे प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे पै. नाना डोंगरे यांनी सांगितले. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचे नवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक किसन वाबळे, निळकंठ वाघमारे, चंद्रकांत पवार, दत्तात्रय जाधव, शुभांगी धामणे, मंदा साळवे, सुवर्णा जाधव, युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदीप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, वाचलानयाच्या उपाध्यक्षा प्रियंका डोंगरे-ठाणगे यांनी अभिनंदन केले. या स्पर्धेसाठी नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांचे मार्गदर्शन लाभले.