नामदेव विठ्ठल मंदिरात आयोजित अखंड हरीनामसप्ताहाचा समारोप
संत नामदेव महाराजांची श्रध्दा, भक्ती व विचार समाजाला दिशादर्शक -आ.संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या 672 व्या संजीवन सोहळ्याचा समारोप शहरात पारंपारिक वाद्यासह पालखी मिरवणुकीने झाला. नामदेव शिंपी समाज ट्रस्टच्या वतीने डावरे गल्ली येथील श्री नामदेव विठ्ठल मंदिरात संजीवन सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मंगळवारी (दि.26 जुलै) सकाळी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते समाजबांधवांच्या वतीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. संत नामदेव विठ्ठलाच्या जयघोषात ढोल, ताशा व बॅण्डपथकासह मोठ्या उत्साहात शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. या मिरवणुकीत ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत मांढरे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पवार, खजिनदार शरद गीते, सहसचिव दिलीप गीते, सचिव सुरेश चुटके, प्रसाद मांढरे, महेश गीते, भरत चांडवले, डॉ. संजय गीते, रविंद्र गीते, रामशेठ पवार, महेश जाधव, प्रफुल्ल जवळेकर, सुजित चांडवले, उमेश गीते, अजय कविटकर, अभिजीत पाडळकर, अशोक जाधव आदींसह समाजातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
आमदार संग्राम जगताप यांनी संत नामदेव महाराजांची श्रध्दा, भक्ती व विचार समाजाला दिशादर्शक आहे. युवकांनी नामदेव महाराजांचे विचार आचरणात आनल्यास सक्षम समाजाची निर्मिती होणार असल्याचे सांगितले. प्रारंभी डोंगरगणचे ह.भ.प. सागर महाराज यांचे नामदेव महाराजांच्या चरित्रावर कीर्तन होऊन या शोभायात्रेची सुरुवात करण्यात आली. शोभायात्रेतील पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. तर ठिकठिकाणी या शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. महिला भजनी मंडळ टाळ घेऊन यामध्ये सहभागी झाल्या होत्या. शोभायात्रेचे बुरुड गल्ली, माणिक चौक, कापड बाजार, तेलीखुंट, दालमंडई, रामचंद्रखुंट, झेंडीगेट ब्राम्हणगल्ली मार्गे मार्गक्रमण होवून, डावरे गल्ली येथे समारोप झाले.
डावरे गल्ली येथील नामदेव विठ्ठल मंदिरात नामदेव महाराजांच्या 672 व्या संजीवन सोहळ्यानिमित्त सात दिवस अखंड हरीनाम, भजन, किर्तन व कथा आदी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. या सप्ताहाला भाविकांसह शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी हजेरी लावली होती. मंदिरास फुलांची व विद्युत रोषणाईची सजावट करण्यात आली आहे. दुपारी ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत मांढरे यांच्या हस्ते महाआरती होऊन भंडार्याने कार्यक्रमाची सांगता झाली.