फिनिक्स फाऊंडेशनच्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरास ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद
342 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्य गरजू घटकातील दृष्टीदोष असलेल्यांना नवदृष्टी देण्याचे कार्य मागील 27 वर्षापासून फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून जालिंदर बोरुडे करत आहे. या अविरत सेवेचे मूल्यमापन होऊन त्याची शासन स्तरावर दखल घेण्याची गरज आहे. श्री विशाल गणपती देवस्थान ट्रस्ट व फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून शहरात गोर-गरीब रुग्णांच्या सेवेसाठी अद्यावत नेत्रालय उभे करण्याचा मानस श्री विशाल गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अभय आगरकर यांनी व्यक्त केला.
फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने नागरदेवळे येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे उद्घाटन शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकार्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आगरकर बोलत होते. याप्रसंगी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले, पंडित खरपुडे, बापूसाहेब कानडे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, यादव एकाडे, हरिभाऊ फुलसौंदर, रंगनाथ फुलसौंदर, ज्ञानेश्वर रासकर, पांडुरंग नन्नवरे, गजानन ससाणे, संजय चाफे, हरिश्चंद्र गिरमे, चंद्रकांत फुलारी, विजयकुमार कोथिंबिरे, रंगनाथ पुंड, अमित खामकर आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात जालिंदर बोरुडे यांनी मागील 25 वर्षापासून फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने सुरु असलेल्या आरोग्य सेवा, नेत्रदान व अवयव दान चळवळीत सुरु असलेल्या कार्याची माहिती दिली. यावेळी श्री विशाल गणपती देवस्थान ट्रस्टचे नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचा तसेच भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झालेले किशोर डागवाले यांचा सत्कार करण्यात आला.
किशोर डागवाले म्हणाले की, फिनिक्स फाऊंडेशन वर्षभर सातत्याने नागरदेवळे येथे महिन्यातून एकदा तर शहरासह जिल्हाभर विविध संघटनांच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर राबविण्यात येत आहे. गोरगरिबांचा डॉक्टर म्हणून जालिंदर बोरुडे यांची ओळख निर्माण झाली असून, सर्वसामान्यांनी त्यांना दिलेली ही उपाधी आहे. सर्वसामान्यांची दखल घेऊन त्यांना दिली जाणारी वैद्यकिय सेवा कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. शासन स्तरावर त्यांचा पुरस्कार रुपाने सन्मान होण्यासाठी शहरात सह्यांची मोहीम राबवण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रा. माणिक विधाते यांनी महागाईच्या काळात सर्वसामान्यांना वैद्यकिय खर्च पेळवत नाही. अशा परिस्थितीमध्ये दीड लाख दृष्टिहीनांना नवदृष्टी मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
सावता महाराज मंदिरात झालेल्या या शिबीरास ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये 342 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. तर 73 रुग्णांवर पुणे येथील के.के. आय बुधराणी हॉस्पिटल मध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र बोरुडे यांनी केले. आभार मोहनीराज कुर्हे यांनी मानले. शिबीर यशस्वी करण्यासाठी ओम बोरुडे, जय बोरुडे, जगदीश बोरुडे, साई धाडगे आदींसह फिनिक्स फाऊंडेशनचे पदाधिकारी व नागरदेवळे ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.