भाकपची शहर कार्यकारणी जाहीर
अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रमिकनगर येथे भाकपची शहर त्रैवार्षिक परिषद व आयटकचा मेळावा पार पडला. यामध्ये तीन वर्षासाठी भाकपची कार्यकारणी जाहीर करुन, कामगार कायद्या विरोधात 28 व 29 मार्च रोजीच्या देशव्यापी संपात उतरण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. भाकपच्या शहर सचिवपदी कॉ. भारती न्यालपेल्ली, सहसचिवपदी सगुणा श्रीमल तर खजिनदारपदी रेणुका अंकाराम यांची नियुक्ती करण्यात आली.
ही परिषद भाकपचे ज्येष्ठ नेते कॉ. कारभारी उगले यांच्या अध्यक्षतेखाली तर अॅड. कॉ. सुधीर टोकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी लाल बावटा जनरल कामगार युनियनच सतीश पवार, मोलकरीण संघटनेच्या अध्यक्षा कमलेश सप्रा उपस्थित होते. विडी कामगार नेते कॉ. शंकर न्यालपेल्ली यांना श्रध्दांजली वाहून बैठकीस प्रारंभ करण्यात आले. मागील तीन वर्षाचा आढावा घेण्यात आला. श्रमिकनगरला कॉ. राम रत्नाकर नगर असे नाव देण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला. तो जिल्हा पक्षाकडे पाठविण्यात येणार आहे.
कॉ. कारभारी उगले म्हणाले की, केंद्र सरकारने कष्टकरी कामगारांच्या कायद्यात बदल करुन भांडवलदार हिताचा निर्णय घेतला आहे. हे कायदे स्थगित करून पूर्वीचे कामगार कायदे लागू करण्याची गरज आहे. यासाठी मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून 28 व 29 मार्च रोजी दोन दिवसीय देशव्यापी संप यशस्वी करण्यात येणार आहे. या संपात सर्व कामगार संघटना उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अॅड. कॉ. सुधीर टोकेकर म्हणाले की, आयटक ही देशातील सर्वात मोठी कामगार संघटना असून, कामगारांच्या न्याय-हक्कासाठी संघर्ष करीत आहे. देशव्यापी संपाचे नेतृत्व आयटक संघटना करीत असून, शहरातील चार ते पाच हजार कामगार या संपात उतरणार आहे. केंद्र सरकारने कामगार कायद्यात बदल करून, 44 कायद्यांचे चार कोड मध्ये रुपांतर केले. हा कोड कामगारांसाठी नव्हे, तर भांडवलदारांच्या हिताचा आहे. सरकारी क्षेत्राचे खाजगीकरण सुरु आहे. भांडवलदारांच्या हिताचे निर्णय घेतले जात असून, कामगार व असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षितता देण्याच्या दृष्टिकोनाने संघटना प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. महेश खिस्ती यांनी कामगारांच्या न्याय-हक्कासाठी रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याची वेळ आली असल्याचे सांगितले. आभार सगुणा श्रीमल यांनी मानले.
भाकपची शहर कार्यकारणी पुढीलप्रमाणे- अॅड.कॉ. सुधीर टोकेकर, महेश खिस्ती, भाग्यलक्ष्मी गड्डम, कमलेश सप्रा, संगीता कोंडा, सुमित्रा जिंदम, शोभा बिमन, शारदा बोगा, लक्ष्मीबाई कोटा, कमलाबाई दोंता, निर्मला न्यालपेल्ली, शोभा पासकंटी, पद्मा चाटला, शोभा अकुल, सुनिता बिटला, माया चिलका, शशिकला भीमनाथ, नरेंद्र पासकंठी