अहमदनगर(प्रतिनिधी)- शैक्षणिक क्षेत्रात निस्वार्थ भावनेने योगदान देऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी राबविलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल पै. नाना डोंगरे यांचा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटनांचे महामंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक
शाळा शिक्षकेत्तर संघटनांचे महामंडळ 49 वे राज्यस्तरीय अधिवेशन संगमनेर येथील मातोश्री लॉन येथे पार पडले. यामध्ये डोंगरे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा पदवीधर आमदार डॉ. सुधीर तांबे, शिक्षक आमदार विक्रम काळे, स्वागताध्यक्षा दुर्गाताई ताबे, महामंडळाचे राज्य अध्यक्ष अनिल माने व आमदार बच्च्चू कडू यांचे स्वीयसहाय्यक विजय बोरसे यांनी सत्कार केला. यावेळी
राज्य उपाध्यक्षा शोभा तांबे, सरकार्यवाह शिवाजी खांडेकर, पुणे विभागीय सचिव गोवर्धन पांडूळे, जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष भिमाशंकर तोरमल, कार्याध्यक्ष भागाजी नवले, सचिव भानुदास दळवी, भाऊसाहेब थोटे, विजय हराळे, किशोर मुथा, पद्माकर गोसावी, जयराम धांडे, सविता शिंदे आदी उपस्थित होते.
आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी पै. नाना डोंगरे यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचे कौतुक करुन भविष्यातील सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या. सामाजिक कार्यकर्ते पै.नाना डोंगरे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटनांचे महामंडळाचे जिल्हा सहसचिव असून, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य सुरु आहे. अनेक गरजू घटकातील विद्यार्थ्यांना आधार देण्याचे कार्य ते सातत्याने करत असतात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी व राष्ट्रीय सणानिमित्त निबंध, चित्रकला, वक्तृत्व व पोस्टर स्पर्धेचे आयोजन करतात. तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजनही केले जाते. या कार्याची दखल घेऊन त्यांचा शिक्षकेत्तर संघटनांचे महामंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे.