बहुजन रयत परिषदने केला सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन रयत परिषद (महाराष्ट्र राज्य) च्या वतीने शहरात इलेक्ट्रॉनिक मीडियात कार्यरत असलेले शुभम पाचारणे यांना समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमात महिला प्रदेशाध्यक्षा कोमलताई ढोबळे यांच्या हस्ते पाचारणे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंती निमित्ताने गुणवंत विद्यार्थी, उत्कृष्ट कलावंत आणि समाजभूषण पारितोषिक वितरण सोहळ्याचे शहरातील ओम गार्डन येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाचरणे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी आमदार संग्राम जगताप, प्रदेश उपाध्यक्ष नारायण साठे, सरचिटणीस ईश्वर क्षीरसागर, कामगार युनियनचे कॉ. अनंत लोखंडे, जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष सत्यवान नवगिरे, जिल्हा सरचिटणीस संतोष साळवे, भगवान मिसाळ, संतीस थोरात उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल पाचारणे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.