शिक्षक परिषदेचे शिक्षण सचिव व शिक्षण आयुक्तांना निवेदन
शैक्षणिक सत्रातील अध्यापन प्रभावीपणे पार पडण्यासाठी शिक्षक कर्मचार्यांची रिक्त पदे भरणे आवश्यक -बाबासाहेब बोडखे
अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना काळातील शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी व नवीन शैक्षणिक सत्रातील अध्यापन प्रभावीपणे पार पडण्यासाठी शिक्षक कर्मचार्यांची रिक्त पदे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून तात्काळ भरण्यास संस्था चालकांना बाध्य करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी शिक्षण सचिव रणजीतसिंह देओल व शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांना देण्यात आले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिले.
शैक्षणिक सत्र 2022-23 नुकतेच सुरु झाले आहे. कोरोना महामारीमुळे अगोदरच विद्यार्थ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे शैक्षणिक नुकसान भरून काढणे व नवीन शैक्षणिक सत्रातील अध्यापन प्रभावीपणे पार पाडणे अत्यावश्यक आहे. याकरिता संच निर्धारणानुसार आवश्यक शिक्षक कर्मचारी कार्यरत असणे आवश्यक आहे. अनेक शाळेत मोठ्या प्रमाणात शिक्षक कर्मचार्यांची पदे रिक्त असून, रिक्त असलेल्या पदावर अतिरिक्त शिक्षक कर्मचार्यांचे समायोजन करणे किंवा नवीन नियुक्ती करणे गरजेचे आहे. त्याशिवाय शैक्षणिक प्रक्रिया प्रभावीपणे पार पाडता येणार नाही. तसेच विद्यार्थ्यांच्या झालेल्या शैक्षणिक नुकसानाची भरपाई अपूर्ण कर्मचार्यांच्या माध्यमातून करता येणार नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
शिक्षक कर्मचार्यांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ही बाब घटनात्मक शिक्षण हक्काचा भंग करणारी आहे. शिक्षक कर्मचार्यांचे रिक्त पदे पवित्र पोर्टलद्वारे तात्काळ भरण्यास संस्था चालकांना बाध्य करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा घटनात्मक हक्क अबाधित ठेवण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली आहे.
कोरोनामुळे दोन वर्षात विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरुन निघणार नाही. मात्र त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. राज्यातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असून, कमी मनुष्यबळाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. शैक्षणिक सत्रातील अध्यापन प्रभावीपणे पार पडण्यासाठी शिक्षक कर्मचार्यांची रिक्त पदे भरणे आवश्यक आहे. -बाबासाहेब बोडखे (शिक्षक परिषद नेते)