• Thu. Dec 12th, 2024

शिक्षकांची सर्व वैद्यकिय बिले शंभर टक्के महिना अखेर अदा केली जाणार

ByMirror

Jul 6, 2022

शिक्षणाधिकारी कडूस यांचे आश्‍वासन

शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्याला अखेर यश -बाबासाहेब बोडखे

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतरांचे प्रलंबीत वैद्यकीय बिले, सर्व प्रकारची पुरवणी देयके व प्रलंबित शालार्थ आयडी मिळण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना देण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी यांनी जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतरांचे प्रलंबीत वैद्यकिय बिले शंभर टक्के महिना अखेर अदा केली जाणार असल्याचे आश्‍वासन दिले. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे, जुनी पेन्शन योजना कोअर कमिटीचे राज्य सचिव महेंद्र हिंगे, मुख्याध्यापक संघाचे शहराध्यक्ष ज्ञानदेव बेरड, शिक्षक परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष बबन शिंदे, दिलीप बोठे, निलेश बांगर, नवनाथ दळवी, बाळासाहेब आंधळे, श्रीकांत वाखारे, राजेंद्र मोरे, अशोक पवार, दत्तात्रय झगडे आदींसह शिक्षक उपस्थित होते.


जिल्ह्यातील सर्व शाळांचे नियमित वेतन वेळेवर केले जात असल्यामुळे शिक्षणाधिकारी कडूस यांचा शिक्षक परिषदेच्या वतीने सत्कार करुन विशेष आभार मानण्यात आले. मागील दोन वर्षापासून अहमदनगर जिल्ह्यातील अनेक मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर बांधवांचे वैद्यकीय देयके, सर्व प्रकारची पुरवणी देयके, सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक, शिक्षकेतर यांची रजा रोखीकरणाची व भविष्य निर्वाह निधीची प्रलंबित देयके व सेवेत असणार्‍या काही शिक्षक, शिक्षकेतरांची ना परतावा, भविष्य निर्वाह निधीची प्रकरणे, अंशतः 20 टक्के व 40 टक्के अनुदानावर आलेल्या कर्मचार्‍यांची नियमित वेतन देयके व फरक बिले, सातव्या वेतन आयोगाचा हप्ता, प्रलंबित शालार्थ आयडीची प्रकरणे मार्गी लावण्याची सातत्याने मागणी होत आहे. यापूर्वी अनेकदा वरील प्रश्‍न संदर्भात निवेदन देण्यात आलेली आहे. प्रत्येक वेळी कोरोना महामारीमुळे शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्यामुळे व शिक्षण उपसंचालक कार्यालयाची नियमित वेतन देयके व्यतिरिक्त इतर पुरवणी व वैद्यकीय देयके पारित करण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे सदरील अनेक देयके अदा झालेले नसल्याने ही देयके प्रलंबित राहिलेली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

जुलै पेड इन ऑगस्टच्या नियमित वेतना बरोबरच अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतरांचे वैद्यकीय देयके व वरील सर्व प्रलंबित देयके देण्यासाठी शासन स्तरावरून निधी उपलब्ध करून अदा करण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.

शिक्षक परिषदेच्या लढ्याला व पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतरांचे वैद्यकिये बिले अनेक वर्षांपासून प्रलंबीत होते. कोरोना काळात तर अनेक शिक्षकांनी उसनवारी करुन, कर्ज घेऊन तर वेळप्रसंगी व्याजाने पैसे घेऊन हॉस्पिटलची बिले भरली. या प्रश्‍नासाठी शिक्षक परिषदेने शिक्षण विभागाशी सातत्याने पाठपुरावा करुन वैद्यकिये बिले मिळण्याची मागणी लावून धरली होती. सर्वच वैद्यकिये बिले निघणार असल्याने शिक्षक व शिक्षकेतरांना मोठा आधार होणार आहे. -बाबासाहेब बोडखे (शिक्षक परिषद नेते)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *