महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी गणेश ढोबळे तर प्रदेश कार्याध्यक्षपदी सुनील सकट
अहमदनगर (प्रतिनिधी)- शाहू, फुले, आंबेडकर, साठे, कलाम सामाजिक विचारमंचच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी गणेश ढोबळे तर प्रदेश कार्याध्यक्षपदी सुनील सकट यांची नियुक्ती करण्यात आली. विचारमंचचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी ढोबळे व सकट यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी जय असोसिएशन ऑफ एनजीओचे अॅड. महेश शिंदे, पो.कॉ. अनिल हराळ, उमंग फाऊंडेशनचे डॉ. संतोष गिर्हे, आरती शिंदे, होमगार्ड शुभम खुडे, महेंद्र गिर्हे, धीरज ढोबळे आदी उपस्थित होते.
शाहू, फुले, आंबेडकर, साठे, कलाम सामाजिक विचारमंच महाराष्ट्रात पुरोगामी विचाराने कार्यकरत आहे. समाजातील दुबळे व शोषित घटकांना न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी विचारमंच प्रयत्नशील आहे. ढोबळे व सकट यांचे सामाजिक योगदान व समाजातील त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची नियुक्ती केली असल्याचे अशोक शिंदे यांनी सांगितले. ढोबळे व सकट यांनी पुरोगामी विचार व लोकशाही मार्गाने विचारमंचच्या माध्यमातून समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. या निवडीबद्दल ढोबळे व सकट यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.