जयंती साजरी न करणार्या अधिकार्यांवर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- शासनाचे परिपत्रक असून देखील जिल्ह्यात अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालयात संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती साजरी झाली नसल्याचा निषेध व्यक्त करत, चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने या प्रकरणी जयंती साजरी न करणार्या संबंधित अधिकार्यांवर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी शासकीय कार्यालयात देण्यात आले. यावेळी समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी साळवे, युवक प्रदेश उपाध्यक्ष सचिन नन्नवरे, सल्लागार अभिजीत शिंदे, युवक जिल्हाध्यक्ष अभिजीत खरात, वधुवर मंडळ अध्यक्ष बापूसाहेब देवरे, बाळकृष्ण जगताप, यश कांबळे आदी उपस्थित होते.
धार्मिक, सामाजिक एकतेचा संदेश देऊन उच्च-नीच भेदभाव दूर करणारे संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती देशासह परदेशातही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सरकारकडून देखील राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात ही जयंती साजरी करण्याचे शासनाच्या परिपत्रकात नमूद करण्यात आलेले आहे. परिपत्रकातील महापुरुषांच्या यादीमध्ये संत रविदास महाराज यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. वास्तव म्हणजे काही ठराविक कार्यालय वगळता ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, महाविद्यालय, पोलीस ठाणे, तलाठी कार्यालय यांसारख्या बहुतांश शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये तर तालुका व जिल्हास्तरावरील कार्यालयामध्ये देखील संत रविदास महाराजांची जयंती साजरी करण्यात आलेली नाही. यात अधिक भर म्हणजे अनेक शासकीय कार्यालयाकडे तर संत रविदास महाराजांचा प्रतिमा देखील उपलब्ध नसल्याचे दुर्दैवी वास्तव समोर आले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
संत रविदास महाराज एका समाजा पुरते मर्यादीत नव्हते. त्यांनी अखंड मानवजातीच्या कल्याणासाठी कार्य केले. जिल्ह्यातील शासकीय कार्यालयामध्ये संत रविदास महाराजांची जयंती साजरी केली गेली नसल्याने चर्मकार समाजाच्या भावना तीव्र आहेत. शासनाचे निर्देश असताना देखील नियम पायदळी तुडविण्यात आले आहे. संत रविदास महाराजांची जयंती साजरी करण्यास टाळाटाळ करणार्या संबंधित सर्व कार्यालयाचे अधिकार्यांवर प्रशासकीय कारवाई करून त्यांना यासंदर्भात जाब विचारण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा प्रशासनाच्या विरोधात चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.