यशोधन प्री स्कूलचा उपक्रम
गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
अहमदनगर (प्रतिनिधी)- यशोधन बहुद्देशीय संस्था संचलित निर्मलनगर येथील यशोधन प्री स्कूलमध्ये शाळेच्या पहिल्यादिवशी विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षरोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा दीपिका श्रीकांत भोस, उपाध्यक्ष गणेश ठोंबरे, सचिव संभाजी भोस आदींसह विद्यार्थी, पालक व शिक्षक उपस्थित होते.
दीपिका भोस म्हणाल्या की, उपनगरातील सर्वसामान्य घटकातील विद्यार्थ्यांना अद्यावत शिक्षण देण्यासाठी 2014 साली शाळेची सुरुवात करण्यात आली. शाळेची गुणवत्ता पाहून परिसरातील नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. शिस्त, ज्ञान व संस्काराने मुलांना सुसंस्कारी करण्याचे काम शालेय शिक्षक करत आहे. कोरोना काळात सर्वांना ऑक्सिजनचे महत्त्व पटले. यासाठी ऑक्सिजन देणारे झाड लावून त्यांचे संवर्धन करण्याचा उपक्रम शाळेच्या पहिल्या दिवशी घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व व वृक्षरोपणाची गरज सांगून पालकांना एक रोप लाऊन ते जगविण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुप्रिया कुलकर्णी, सविता नागरगोजे, योगिता ठोंबरे, सुभेदार महादेव करंजुले, श्रीकांत भोस आदींसह शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारींनी परिश्रम घेतले.