वंचित घटकातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देऊन कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- परिस्थिती बदलण्याची शक्ती शिक्षणात असून, यासाठी वंचित घटकातील विद्यार्थ्यांना नेहमीच शैक्षणिक मदत उपलब्ध करुन दिली जात आहे. दुर्बल, वंचित घटकांना मदत करणे हीच खरी माणुसकीची ओळख असून, वाढदिवसानिमित्त वंचित घटकातील गरजू विद्यार्थ्यांना राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मदत देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याची भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.
शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने व महेश भणभणे सरांच्या सहकार्याने आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित व गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची किट भेट देण्यात आली. यावेळी आमदार जगताप बोलत होते. यावेळी माजी मंत्री शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास शिंदे, ओबीसी सेलचे अमित खामकर, अल्पसंख्यांक विभागाचे साहेबान जहागीरदार, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, अमोल कांडेकर, निलेश इंगळे, मारुती पवार, लहू कराळे, गणेश बोरुडे, संतोष ढाकणे, मळू गाडळकर, प्रा. शिवाजी म्हस्के, अभिजीत सपकाळ आदी उपस्थित होते.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, शहराला विकासाची दिशा आमदार संग्राम जगताप यांच्या रुपाने मिळाली. आपल्या कार्यकर्तृत्वाने त्यांनी सर्वसामान्यांच्या मनामध्ये स्थान निर्माण केले आहे. कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्यांच्या पाठिशी ते उभे राहिले. राजकारण बाजूला ठेऊन शहराचा विकास हेच ध्येय समोर ठेऊन ते प्रत्येक प्रभागात विकास कामे मार्गी लावत आहे. सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्याच्या त्यांच्या आवहानाला प्रतिसाद देत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.