महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी त्यांचे विचार आत्मसात करुन साजरी केल्यास समाजाला दिशा मिळणार -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तर लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. सिध्दार्थनगर येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते तर टिळक रोड येथील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, व्यापारी सेलचे अनंत गारदे, फुले ब्रिगेडचे दीपक खेडकर, माजी नगरसेवक गौतम भांबळ, राजेंद्र पडोळे, लहू कराळे, उमेश धोंडे, गणेश बोरुडे, सिद्धार्थ आढाव, अजय दिघे, अंकुश मोहिते, विजय वडागळे, मनिष साठे, साहेबराव काते आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, दोन्ही महापुरुषांनी देशाच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचे योगदान दिले. लोकमान्य टिळकांचा स्वातंत्र्य संग्रामातील लढा तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी केलेला संघर्ष न विसरता येणारे आहे. एका पर्वाचा अस्त तर दुसर्या पर्वाचा उदय हा मोठा योगायोग आहे. स्वातंत्र्य चळवळीत लोकमान्य टिळकांनी महत्त्वाची भूमिका बजावली तर समाज जागृतीची ज्योत अण्णाभाऊंनी पेटवली. महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी त्यांचे विचार आत्मसात करुन साजरी केल्यास समाजाला दिशा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. माणिक विधाते यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊंचे नांव अग्रक्रमाणे घेतले जाते. अण्णाभाऊ साठे आंबेडकरवादी विचारांचे होते. लोककलेच्या माध्यमातून त्यांनी समाज जागृतीचे कार्य करुन, वंचितांचे प्रश्न मांडले. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये भरीव कार्य केले. दोन्ही महापुरुषांचा लढा आजच्या युवकांना प्रेरणा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले.