मराठा सेवा संघ, जिजाऊ महिला ब्रिगेड व काळे फाउंडेशनचा पुढाकार
स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष ऐतिहासिक करण्यासाठी प्रत्येकाने घरावर तिरंगा फडकवावा -आयुक्त डॉ. पंकज जावळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- तिरंगा राष्ट्राचा अभिमान व अस्मिता असून, अमृत महोत्सवी वर्ष ऐतिहासिक करण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा. या अभियानात प्रत्येक भारतीयांनी मनापासून सहभागी होण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सुरु असलेल्या हर घर तिरंगा अभियान घरोघरी पोहचविण्यासाठी मराठा सेवा संघ, जिजाऊ महिला ब्रिगेड व विजया लक्ष्मण काळे फाउंडेशनच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या जनजागृती मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी आयुक्त डॉ. जावळे बोलत होते. प्रोफेसर चौक येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी फाऊंडेशनच्या अध्यक्षा अनिता काळे, शहर अभियंता सुरेश इथापे, विद्रोही साहित्य विचारमंचचे सुभाष सोनवणे, मिनाक्षी जाधव, मायाताई हराळ, अलका मुंदडा, मिनाक्षी वाघस्कर, सविता गांधी, किशोरी भोर, इंदूताई गोडसे, सरला सातपुते, शारदा पोखर्णा, वसंत कर्डिले, राजेंद्र निमसे, आशा गायकवाड, आरती कर्नावट, स्वप्ना शिंगी, सोहनी दसपुते, माया हराळ, भाग्येश सव्वाशे, पुजा कोंडा, संतोष हराळ, विशाल पोखर्णा, अशोक वाळके, सुनिल वाळके, मनिषा वाघ, सोहनी पुरणाळे, गणपत दसपुते, सुनिता पुजारी, लता पठारे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पुढे आयुक्त डॉ. जावळे म्हणाले की, देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करीत आहे. त्याचा एक भाग म्हणून स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार आहे. महापालिकेच्या माध्यमातून शहरात 33 केंद्रावर तिरंगा झेंडा पुरविण्याचे काम सुरू आहे. फाउंडेशनने राबविलेला उपक्रम कौतुकास्पद असून, ध्वजाची संहिता पालन करून या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग नोंदविण्याचे त्यांनी सांगितले.
अनिता काळे यांनी हर घर तिरंगा अभियान घरोघरी घेऊन जाणार आहे. तिरंगा हा भारतीयांची अस्मिता व अभिमान असून, स्वातंत्र्य दिनी प्रत्येकाच्या घरावर देशाचा अभिमान शानदारपणे फडकणार आहे. प्रत्येक भारतीयांना झेंडा फडकविण्याची संधी मिळणार असल्याचे त्या म्हणाल्या. सुरेश इथापे यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या क्रांतिकारकांची आठवण ठेऊन त्यांना अभिवादन करण्यासाठी या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होण्याचे सांगितले.
या अभियानातंर्गत नागरिकांना वाटप करण्यात येणार्या ध्वजाचे अनावरण करण्यात आले. भारत माता की जय…. वंदे मातरमच्या जय घोषणा देऊन हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी फाऊंडेशनच्या महिला पुढे सरसावल्या आहेत.