डावरे गल्ली येथील श्री नामदेव विठ्ठल मंदिरात अखंड हरीनाम सप्ताहानिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या संजीवन सोहळ्यानिमित्त डावरे गल्ली येथील श्री नामदेव विठ्ठल मंदिरात मंगळवारी (दि.19 जुलै) अखंड हरीनाम सप्ताहाचा प्रारंभ झाला. सनई चौघड्यांचे संगीत, रांगोळीचा सडा, भजनी मंडळ व भाविकांच्या उपस्थितीत नामदेव शिंपी समाज ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत मांढरे यांच्या हस्ते सकाळी विधीवत महापूजा व वीणा पूजनाने पार पडले.
श्रीकांत मांढरे म्हणाले की, श्रध्दा व भक्तीचे उत्तम उदाहरण नामदेव महाराज आहे. रामकथेत उत्तम प्रपंच व जीवनाच्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश आहे. जीवनात भक्ती असवी, भक्तीच श्रेष्ठत्वाकडे घेऊन जाते. नामस्मरणाने ज्ञानाचे दीप प्रज्वलीत होते. नामस्मरणात जो रंगून जातो त्याला जीवनात आनंद व समाधान मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
या सप्ताहाच्या शुभारंभा प्रसंगी ट्रस्टचे सचिव सुरेश चुटके, सहसचिव दिलीप गिते, प्रसाद मांढरे, भजन किर्तन समिती प्रमुख महेश जाधव, प्रफुल्ल जवळेकर, ज्ञानेश्वर कविटकर, अरुण जवळेकर, स्मिता गिते, संजीवनी गिते, रंजना गिते आदींसह समाजबांधव व महिला उपस्थित होत्या. कोरोनाच्या दोन वर्षानंतर श्री नामदेव महाराजांचा पुण्यतिथी सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमाणी साजरा होत आहे. या सोहळ्यानिमित्त डावरे गल्लीतील नामदेव विठ्ठल मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट करण्यात आली आहे.
या सात दिवसीय कार्यक्रमात सकाळी अभिषेक, दुपारी भजन-किर्तन व संध्याकाळी ह.भ.प. निळकंठ महाराज देशमुख यांचे प्रवचन होणार आहे. किशोर देठ, अमोल खोले, विकास तोडकर, बबनराव होनकर, गणेश होनकर, मयुरेश जाधव, महेश जाधव यांच्या उपस्थितीमध्ये दररोज अभिषेक होणार आहे. मंगळवार दि.26 जुलै रोजी सकाळी ह.भ.प. सागर रावळ महाराज यांच्या किर्तनानंतर ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत मांढरे यांच्या हस्ते मिरवणुकीचे प्रारंभ होणार आहे. त्यानंतर आरती होऊन महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. या संजीवन सोहळ्यात सहभागी होण्याचे समाजबांधवांना आवाहन करण्यात आले आहे.