तहानलेला घसा, हाडे खिळखिळी अन घामाने नागरिक बेहाल
नगरकर वीज, पाणी, रस्ते प्रश्नाच्या चक्रव्यूहात
अहमदनगर(प्रतिनिधी)- शहरात तातडीच्या भारनियमानाने रात्री होणारा विजेचा लपंडाव, शहरातील पाण्याची बोंब व रस्त्यांचा प्रश्नामुळे सर्वसामान्य जनता वैतागली असून, संयमशील नगरकरांचा शेवटी आक्रोश व संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.
शहरातील अनेक रस्त्यांची चाळण बनली आहे. काही रस्त्यांचे काम मार्गी लागले तर बहुतांश खड्डेमय व धुळीने माखलेले आहे. नागरिकांना खड्डेमय रस्त्यांमुळे पाठ आणि कंबरेच्या मणक्याचे त्रास उद्भवत आहे. रस्त्यांसाठी ओरडणार्या जनतेला आता उन्हाळ्यात पाण्यासाठी बोंबा माराव्या लागत आहे. शहराला दिवसाआड पाणी असले तरी, अनेक भागात चार ते पाच दिवस पाणी येत नाही. अनेक ठिकाणी पुर्ण दाबाने व शुध्द पाणी येत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. माठफोडो आंदोलन, आयुक्तांना रिकाम्या बाटल्या भेट व नळाची पूजा करुनही हे प्रश्न सुटलेले नाही. मागील अकरा वर्षापासून फेज टू चे काम सुरु असून, अद्यापि सदरचे काम पुर्णत्वास गेलेले नाही. शहराची लोकसंख्या, विस्तारीकरण झपाट्याने वाढत असताना मनपा प्रशासनाच्या नियोजनशुन्य कारभाराने नागरीप्रश्न गंभीर बनत चालले आहे.
महाराष्ट्र भारनियमात बुडाला असताना नगर शहराची परिस्थिती एखाद्या खेड्यागावाप्रमाणे झाली आहे. महावितरणने भारनियमनाचे वेळापत्रक जाहीर केले. मात्र काही भागात त्यावेळेप्रमाणे भारनियमन न होता तातडीच्या भारनियमनाखाली नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. रात्री व पहाटे भारनियमन करण्यात आल्याने उकाड्याने नागरिकांची झोप उडाली आहे. मध्यरात्री अक्षरश: रात्र जागून काढण्याची वेळ महावितरणने नागरिकांवर आनली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना सर्वसामान्यांचे वीज, पाणी व रस्ते या मूलभूत प्रश्नावरच संघर्ष करावा लागत आहे. हे प्रश्न नगरकर संयमाने हाताळत असताना, या तिन्ही प्रश्नाच्या चक्रव्यूहातून नगरकर जात असून, हा चक्रव्यूह भेदण्यासाठी त्यांच्या संयमाचा बांध सुटून उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.