महिला-पुरुषांसह तरुणाईचा उत्स्फुर्त सहभाग
आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक योग दिनाचे औचित्य साधून रविवारी (दि.19 जून) शहरातील वाडिया पार्क क्रीडा संकुलमध्ये योग सोहळा दिमाखात पार पडला. महिला-पुरुषांसह तरुणाईने या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन योगाचे धडे गिरवले.
सुख योगा व स्वस्तिक नेत्रालय व मॅटर्निटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने योग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे 6 वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, योग गुरु सागर पवार व देवा सर यांच्या हस्ते या सोहळ्याचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन झाले.
प्रारंभी नृत्य झंकारच्या मुलींनी बहारदार गणेश वंदना सादर केली. तर गिरीराज जाधव यांनी सादर केलेल्या सत्संगने सकाळचे अल्हाददायक वातावरण प्रफुल्लित व प्रसन्न झाले होते. योग गुरु सागर पवार यांनी मंत्रोच्चाराने योगाची सुरुवात केली. यामध्ये सुर्यनमस्कार, वीरभद्रासन, उत्कटासन, उत्तरासन, सेतुबंधासन, नटराजासन, त्रिकोनासन आदी आसने प्रात्यक्षिकांसह योग साधकांकडून करुन घेतले.
अवघड असलेले विविध आसने त्यांनी सोप्या पध्दतीने करण्याचे प्रात्यक्षिक दाखवून त्याचे महत्त्व व निरोगी शरीरासाठी असलेले फायदे विशद केले. पवार यांनी निरोगी आरोग्यासाठी एक दिवसापुरता योग न करता आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य अंग बनविण्याचे आवाहन केले. यावेळी किरण गायकवाड, सागर ढवण, गायत्री गार्डे, ऋतूजा हेडा, प्राची घुले, माधवी दांगट, अपर्णा धरम, श्रीराम दिवटे, पांडूरंग दातीर, निलेश हेडा, ऋतुजा हेडा, आशिष कुमार, डॉ. प्रफुल्ल चौधरी, कल्याणी चौधरी, महाजन, रासने, मयुरी चव्हाण, कविता कुमावत, मोहसीन सय्यद, यशस्विनी ससे, मोक्षी बोरा, धनश्री गायकवाड, अंतून वारुळे, श्रेयश लगड, अक्षय शर्मा आदी उपस्थित होते.
देवा सर यांनी बदलत्या जीवनशैलीत आरोग्यासाठी वरदान असलेल्या प्राचीन भारतीय योग चिकित्सेला संपूर्ण जगाने स्विकारले आहे. कोरोना काळात अनेक रुग्णांनी योग-प्राणायामचा अवलंब केल्याने त्यांच्यात लवकर सुधारणा होऊन ते बरे झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. उत्तम आरोग्यासाठी योग-प्राणायाम दररोज करण्याचे त्यांनी सांगितले.
स्पर्धेच्या व धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्ती व्यायामापासून दुरावत असून, ताण-तणावाखाली वावरत आहे. चुकीची आहार पध्दती, व्यायामाचा अभाव व तणावपूर्ण जीवनामुळे बहुतेकांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. जीवन निरोगी व शरीर सदृढ राहण्यासाठी नागरिकांमध्ये योग-प्राणायामाची आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शेवटी प्राणायाम व शवासनने योग शिबीराचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर व मृणाल कुलकर्णी यांनी केले. आभार गायत्री गार्डे यांनी मानले.
सागर पवार व गौरी गोर यांनी सादर केलेला कपल योगा, तर मुक्ता कुलकर्णी हिने कॅण्डल योगाचे चित्तथरारक प्रात्यक्षिक दाखवून उपस्थितांची मने जिंकली. या योग सोहळ्यात जिल्हा क्रीडा अधिकारी बिले यांनी देखील सहभाग घेऊन विविध आसने केली.
दिमाखदार योग सोहळ्याची नियोजनबध्दपणे तयारी करण्यात आली होती. आलेल्या साधकांना शिकवण्यासाठी महिला व पुरुष योग प्रशिक्षकांची टिम उपस्थिती होती. योग साधकांना मॅट पासून ते टी शर्ट उपलब्ध करुन देण्यात आले होते. मैदानात शेवट पर्यंत असलेल्या योग साधकांना प्रात्यक्षिक दिसण्यासाठी दोन्ही बाजूने एलईडी वॉलची व्यवस्था करण्यात आली होती. या सोहळ्यात युवक-युवतींची उपस्थिती प्रेक्षणीय राहिली.