घोड्यांच्या रथामधील स्वार विठ्ठल, रुक्मिणी व संतांच्या वेशभुषेतील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष
अहमदनगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त बाल वारकरी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
हातात भगवे ध्वज, टाळ-मृदूंगचा निनाद, जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष करीत बाल वारकर्यांनी शहरातून दिंडी काढली. विठ्ठल, रुक्मिणी व संतांची वेशभूषा करून घोड्यांच्या रथात स्वार झालेल्या बाल वारकरींनी सर्वांचे लक्ष वेधले.
ज्ञानोबा… तुकाराम… च्या जयघोषाने शहरातील परिसर बाल दिंडीने निनादला. पांढरी टोपी, कपाळी गंध, पायजमा, बंडी या पोशाखातील लहान मुले, तर रंगीबेरेंगी साड्या परिधान करुन मुलीं दिंडीत सहभागी झाले होत्या. ठिकठिकाणी नागरिकांनी बाल वारकरींचे स्वागत करुन कौतुक केले.
कापड बाजार, तेली खुंट, नवी पेठ व अर्बन बँक मार्गे दिंडी पुन्हा शाळेत पोहचली. शाळेच्या प्रांगणात अभंग, गवळण, कीर्तन, भारुड, भक्ती गीते, फुगड्यांचा फेर धरत रिंगण सोहळा उत्साहात पार पडला. बालदिंडीसाठी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस. एल. ठुबे व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक शिवाजीराव लंके यांचे मार्गदर्शन लाभले.
शाळेत पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी पंगतीत बसून साबुदाणा खिचडी, फराळचा एकत्र आस्वाद घेतला. दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षिक, शिक्षिका यांचे सहकार्य लाभले.