विजेत्यांना सोने व चांदीचे मोदक बक्षिसे
स्पर्धेला शालेय विद्यार्थ्यांसह महाविद्यालयीन युवक-युवतींचा उत्स्फुर्त प्रतिसाद
अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा होण्यासाठी शहरातील नंदनवन लॉनमध्ये शाडूच्या मातीपासून गणपती बनवा कार्यशाळा व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला शालेय विद्यार्थ्यांसह महाविद्यालयीन युवक-युवतींचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेतील विजेत्यांना सोने व चांदीचे मोदक बक्षिस म्हणून देण्यात आले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोहसीन सय्यद, प्रसिद्ध चित्रकार सुजाता पायमोडे व सांदिपनी अकॅडमीच्या पुढाकाराने या कार्यशाळा व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बालगोपाळांसह महिलावर्गाने विविध रुपात श्री गणेशाच्या मुर्त्या साकारल्या. सुजाता पायमोडे यांनी यावेळी गणेश मुर्त्या बनविण्याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. पायमोडे म्हणाल्या की, सण-उत्सव साजरे करताना पर्यावरणाचा समतोल राखणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी शाडूच्या मातीचे गणपती तयार करून त्याचे महत्त्व बालगोपाळांना समजावे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेबरोबरच बालगोपाळांना आपला आवडता गणपती स्वतः तयार करता यावा व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्पर्धेतील चार गटातील प्रथम आलेले सारा खर्डे, तनिया देवकर, अर्चना सांगळे, कृष्णा मारवडे यांना प्रत्येकी 11 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मोदक व द्वितीय क्रमांक पटकावलेल्या अवंतिका काळे, सेजल खुटारे, पूजा खळदकर, आर्यन पंतीपका यांना प्रत्येकी 2100 रुपये किमतीचे चांदीचे मोदक बक्षीस स्वरूपात देण्यात आले. तसेच या स्पर्धेत सहभागी सर्व बालगोपाळांना भेट वस्तू देण्यात आल्या.
यावेळी नगरसेविका सुवर्णा जाधव, उद्योजक दत्ता जाधव, लोकेश शिंगवी, साहिल जोडेजा, अभिनाथ शिंदे, प्रियंका चिखले, अर्पिता जैन, श्रीलता आडेप, फिरोज शेख, गणेश सर, पूजा खिळदकर, अनुराधा मॅडम, मोहसीन सय्यद, सुजाता पायमोडे आदी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी नंदनवन उद्योग समुह, व्यंकटेश मल्टीस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, कुबेर मार्केट, सोनी गिफ्ट हाऊस, इनरव्हील क्लब ऑफ अमदनगर, नगरी चहा, कलारंग अकॅडमी यांचे विशेष सहकार्य लाभले. स्पर्धेचे परीक्षण मुर्तीकार विकास कांबळे यांनी केले.