मोहम्मद पैगंबराबद्दल चुकीचे व आक्षेपार्ह विधान केल्याचा निषेध
शर्माला अटक करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल चुकीचे व आक्षेपार्ह विधान करणार्या भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा हिचा पुतळा शहरातील कोठला चौकात दहण करण्यात आला. शर्मा हिने मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे पडसाद देशासह जगभर उमटत असताना शहरात बुधवारी (दि.8 जून) आंदोलन करण्यात आले.
मुस्लिम समाजाच्या युवकांनी एकत्र मोर्चाने येऊन नुपूर शर्मा हिच्या प्रतिकात्मक पुतळ्यास चपलांचा हार घालून जोडे मारले. साहेबान जहागीरदार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात अब्दुल रऊफ खोकर, मुजाहिद शेख, शहानवाझ शेख, रेहान कुरेशी, सुफियान शेख, तन्वीर शेख, खालिद शेख, समीर खान, नवेद शेख आदींसह मुस्लिम युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संतप्त आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करुन शर्मा हिच्या अटकेची मागणी केली. यावेळी पोलीसांनी आंदोलन करणार्या प्रमुख पदाधिकार्यांना अटक केली. इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी संपूर्ण जगाला प्रेम, शांतता व बंधुत्वाची शिकवण दिली आहे. त्यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य करून नुपूर शर्माने संपूर्ण देशातील मुस्लिम समाज बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. कोणताही मुस्लिम व्यक्ती पैगंबरांबद्दल चुकीचे व बेताल वक्तव्य खपवून घेणार नाही. जातीवादी व धर्मांध शक्तींशी जोडलेल्या नुपुर शर्मा कठोर कारवाई करून त्यांना अटक करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
कोणत्याही परिस्थितीमध्ये देशात मोहम्मद पैगंबरांचा अवमान सहन केला जाणार नाही. अशा प्रकारे धर्मांधशक्ती शांतता व सुव्यवस्था बिघडविण्याचे काम करत आहे. धर्मांधतेणे देश चुकीच्या मार्गावर जात असून, अल्पसंख्यांक समाजाला एक प्रकारे टार्गेट करण्याचे काम केले जात आहे. एका नुपूर शर्माने पैगंबराबद्दल केलेल्या चुकीच्या वक्तव्याने 56 राष्ट्रांनी निषेध नोंदवला आहे. अरब देशात मोठ्या प्रमाणात भारतीय माल व उत्पादने निर्यात केल्या जातात. अरब देशांनी भारतीय उत्पादनावर बंदी घातल्याने याचा फटका सर्वसामान्य शेतकरी, व्यापारी यांना बसला आहे. यामुळे देशाची आर्थिक व्यवस्था बिघडू शकते. याला सर्वस्वी जातीयवादी भाजप सरकार जबाबदार असल्याचे साहेबान जहागीरदार यांनी म्हंटले आहे.