• Thu. Dec 12th, 2024

शहरात बकरी ईद उत्साहात साजरी

ByMirror

Jul 10, 2022

ईदगाह मैदानात सामुदायिक नमाज अदा

देशात शांतता, समृध्दी व सामाजिक सलोख्यासाठी प्रार्थना

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरासह जिल्ह्यात मुस्लिम समाज बांधवांनी बकरी ईद (ईद उल अज्हा) रविवारी (दि.10 जुलै) मोठ्या उत्साहात साजरी केली. शहरातील ईदगाह मैदान मध्ये सकाळी 9:30 वाजता ईदची नमाज मौलाना नदिम अख्तर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या बकरी ईदनिमित्त कुर्बानीसाठी लागणारे बोकडं खरेदी-विक्रीत जिल्ह्यात कोट्यावधीची उलाढाल झाली.


सकाळी 7 वाजल्यापासून शहरातील विविध मशिदी मधून बकरी ईदची नमाज अदा करण्यात आली. ईद निमित्त प्रमुख नमाज पठण कोठला येथील ईदगाह मैदानात झाली. प्रारंभी धार्मिक व्याख्यान, ईदची नमाज, खुदबा व त्यानंतर मुस्लिम बांधवांनी देशात शांतता, समृध्दी व सामाजिक सलोख्यासाठी प्रार्थना केली. ईदच्या नमाजनंतर दिवसभर रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने दिवसभर वातावरण ढगाळ व अल्हाददायक होते. मुस्लिम बांधवांनी एकमेकांच्या भेटी-गाठी घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.


बकरी ईदला कुर्बानीसाठी लागणारे बोकडांच्या किंमती मध्ये या वर्षी मोठी वाढ दिसून आली. जिल्ह्यातील विविध तालुक्यातील आठवडे बाजारात बोकडांची खरेदी विक्री सुरु होती. साधारणत: 12 हजार रुपयापासून ते लाख रुपये पर्यंतचे बोकडे बाजारात उपलब्ध होते.


बकरी ईद निमित्त तीन दिवस म्हणजे रविवार पासून मंगळवार पर्यंत घरोघरी कुर्बानी केली जात आहे. ईद व आषाढी एकादशी एकाच दिवशी आल्याने हिंदू-मुस्लिम बांधव देखील एकमेकांना सणाच्या शुभेच्छा देताना दिसले. तर अनेकांनी सोशल मिडीयावर बकरी ईद व आषाढी एकादशीच्या शुभेच्छांची पोस्ट टाकून धार्मिक एकतेचे दर्शन घडविले. पोलीस प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून ईदगाह मैदानसह शहरातील चौका-चौकात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *