सरकार चषक व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन
जिल्ह्याच्या वैभवात भर टाकणारा क्रीडा क्षेत्र निर्माण करणार -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी प्रयत्नशील असून, खेळाडूंना व विविध खेळांना प्रोत्साहन देण्याचे कार्य सुरू आहे. मैदानी खेळाणे युवकांचा सर्वांगीण विकास होतो. रोगप्रतिकारशक्ती वाढीस लागते व मन प्रसन्न राहून, शरीर सुदृढ बनते. खेळामुळे युवक एकत्र येऊन सामाजिक एकतेची भावना वृद्धिंगत होत असते. कोरोना काळानंतर मोबाईलकडे वळालेली युवा पिढी मैदानी खेळाकडे वळताना दिसत असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. तर जिल्ह्याच्या वैभवात भर टाकणारा क्रीडा क्षेत्र निर्माण करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
अनंत बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने शहरातील पंचपीर चावडी येथील सहकार क्रीडा मंडळ येथे आयोजित करण्यात आलेल्या सरकार चषक व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटनप्रसंगी आमदार जगताप बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, अनंत बहुउद्देशीय संस्थेचे फैय्याज शेख केबलवाला, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे, कासम केबालवले, प्रा. श्रीकांत निंबाळकर, प्रा.राजेंद्र धिरडे, डॉ .अनिल बोरगे, राष्ट्रीय खेळाडू राजेंद्र सुद्रीक, आनंद सप्रे, संजय क्षीरसागर, इम्रान सय्यद, वसीम खान, शादाब खान, पठाण मेंबर, उजेर सय्यद, शानू दारूवाला, पै.भोला पठाण, वसीम शेख, नईम जहागीरदार, आसीम शेख, अरबाज बागवान, शाकीर बागवान, बबलू जहागीरदार, पंकज ओहोळ, अभिजित खरपुडे, सुदर्शन ढवळे, सैफ शेख आदीसह खेळाडू पाचपीर चावडी पार्टीचे सर्व सदस्य व सहकार क्रीडा मंडळाचे खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे आमदार जगताप म्हणाले की, मुकुंदनगर भागात क्रीडा मैदाने विकसित करून दिल्याने, त्या भागात क्रीडा क्षेत्राला व व्हॉलीबॉल खेळाला चालना मिळाली. लवकरच महापालिकेच्या मालकीचा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार असून, तसेच जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचेही आयोजन केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रास्ताविकात अभिजित खोसे यांनी मोबाईलमध्ये गुंतलेला युवा वर्ग मैदानी खेळाकडे वळावा, खेळाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता अखंडित रहावी आणि बंधुत्व व जातीय सलोखा वाढविण्याच्या दृष्टीकोनाने शहरात सामाजिक कार्य करणारी अनंत बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या माध्यमातून सरकार चषक व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. पाहुण्यांचे स्वागत फैय्याज शेख केबलवाला यांनी केले. आभार कासम केबालवले यांनी मानले.