चिमुकल्यांची सुपरफास्ट गणितीप्रक्रिया पाहून उपस्थित अवाक
विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेसाठी अबॅकसची भूमिका महत्त्वाची -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- प्राथमिक शिक्षणापासूनच प्रत्येक विषयाचे क्लासेस सध्या सुरू आहे. पूर्वी शाळेतच सर्व विषयांचा अभ्यासक्रम होत होता. स्पर्धा वाढली असून, विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेसाठी अबॅकसची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. शिक्षण क्षेत्र अपडेट होत असून, या बदलत्या शिक्षण पध्दतीचा स्विकार करुन पुढे गेल्यास यश मिळणार आसल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. तर स्पर्धेत उतरल्याशिवाय आपल्यातील गुणवत्ता व कौशल्याची क्षमता समजत नाही, यासाठी विद्यार्थ्यांना स्पर्धेत उतरण्याचे त्यांनी आवाहन केले.
युनिव्हर्सल अबॅकस अॅण्ड वैदिक मॅथस असोसिएशनच्या वतीने शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय अबॅकस स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमाप्रसंगी आमदार जगताप बोलत होते. यावेळी उद्योजक तथा वक्ते एन.बी. धुमाळ, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडूळे, नगरसेविका दिपाली बारस्कर, प्रशांत गोरे, सामाजिक कार्यकर्ते भैय्या बॉक्सर, मुख्याध्यापक किशोर तळेकर आदी उपस्थित होते.
पाहुण्यांचे स्वागत सुनिल काळाणे यांनी केले. प्रास्ताविकात युनिव्हर्सल अबॅकसच्या उपाध्यक्षा हेमलता काळाणे म्हणाल्या की, अबॅकस फक्त गणितीय प्रक्रियेपुरता मर्यादीत नसून, विद्यार्थ्यांची बुध्दीमत्तेच्या विकासासाठी उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांची बुध्दीमत्ता वाढल्यास त्याचा सर्वांगीन विकास होतो. या गणितीय प्रक्रियेत दोन्ही हातांचा वापर करण्याचे शिकवले जाते. यामुळे दोन्ही मेंदूला चालना मिळून विद्यार्थ्यांची बुध्दी अत्यंत कुशाग्र होते. याचा विशेष उपयोग स्पर्धा परीक्षांसाठी होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एन.बी. धुमाळ यांनी यशस्वी जीवनाचा मार्ग आपल्या प्रेरणादायी भाषणातून उलगडला. त्यांनी ध्येय गाठण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणे गरजेचे आहे. हातावरील रेषांपेक्षा मनगटातील ताकत व बुध्दीने जग जिंकता येणार आहे. हार्डवर्कपेक्षा स्मार्ट वर्कला या युगात महत्त्व प्राप्त झाले आहे. अबॅकस स्मार्टवर्क करण्याचे शिकवते. कमी वयातच मुलांना घडविण्यासाठी जागरुक राहण्याचा सल्ला त्यांनी पालकांना दिला. ज्ञानदेव पांडुळे यांनी एकाग्रतेसाठी अबॅकस गरजेचे आहे. एकाग्रता नसल्यास शिक्षणाचे आकलन होऊ शकत नाही. बुद्धिमत्ता वाढण्यास एकाग्रता गरजेची असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरात आयोजित जिल्हास्तरीय अबॅकस स्पर्धेत मोठमोठी गणिते झटपटपणे सोडवित अवघ्या 5 मिनीटाच्या आतमध्ये आपला पेपर सोडवित उपस्थितांना अवाक केले. या स्पर्धेत जिल्ह्यातील दोनशे पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. सकाळी या स्पर्धेला प्रारंभ झाले होते. ही स्पर्धा ज्युनिर लेवलसह पहिल्या ते पाच लेवल पर्यंन्त 11 फेरीत झाली. 5-5 मिनीटाच्या फेरीत अवघड गणिती प्रक्रियेचे पेपर विद्यार्थ्यांनी अत्यंत जलदगतीने सोडविली. स्पर्धेनंतर विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम रंगला होता. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
या स्पर्धेत मास्टर जूनियर- प्रथमेश बोरुडे (श्रीगोंदा), जूनियर लेवल- अनुष्का भनभने (सारसनगर), फर्स्ट लेवल- काजल तनपुरे (मिरजगाव), सेकंड लेवल- अथर्व लोटके (बोल्हेगाव फाटा), थर्ड लेवल- पार्श बंब (भिस्तबाग), फोर्थ लेवल- आयुष धापटकर (पारिजात कॉर्नर), फिफ्थ लेवल- अमित कडू (पाईपलाइन रोड), वेदिक मॅथ्समध्ये- वेदिका काळाणे (सावेडी) यांनी चॅम्पियनशीप मिळवली.
चॅम्पियनशीप मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसह प्रत्येक गटातील पहिल्या तीन क्रमांक पटकाविणार्यांना पाहुण्यांच्य हस्ते बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण अमोल देशमुख, दादा घालमे, कांचन मुठे, अश्विनी आढाव, स्वाती घुले, जितेंद्र कोकणे यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संदीप खरमाळे, संतोष काकडे, प्रतिक शेकटकर, ऋग्वेदि कदम, मनोहर लकडे, युनिव्हर्सल अबॅकस अकॅडमीच्या सहकार्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अमोल बागुल यांनी केले. आभार महेश महांडूळे यांनी मानले.