अनाधिकृत मजल्यावरील फ्लॅटची केली विक्री
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात फ्लॅट खरेदीच्या व्यवहारात बांधकाम व्यावसायिकाने एकाची वीस लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तंबाखू व्यावसायिक रोहन प्रकाश जडला (वय-30, रा. नालेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बिल्डर आयुब बशीर खान (रा. रुबाबशीर बंगला, शीला विहार सावेडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिल्डर आयुब खान याने सन 2016 मध्ये शहरातील सातपुते तालीम जवळ विक्रीसाठी फ्लॅट बनविले असल्याची माहिती जेटला यांना मिळाली होती. जेटला यांना घर खरेदी करायची असल्याने त्यांनी खान यांच्याकडे फ्लॅट खरेदी बाबत विचारपूस केली. त्यावेळी त्याने बिल्डींगची कागदपत्रे आणि उतारे दाखविल्याने जेटला यांनी फ्लॅट विक्रीची तयारी दर्शवली होती.
8 एप्रिल 2016 रोजी खान याने जेटला यांच्या वडिलांना तिसर्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 16 अ चे 12 लाख रुपयांचे अर्धवट बांधकामाचे साठेखत करून दिले होते. त्यापैकी 8 लाख रुपये धनादेशाने तर 4 ला रुपये रोख स्वरूपात देण्यात आले होते. त्यानंतर 7 ऑक्टोंबर 2020 रोजी बिल्डर खान याने दुय्यम निबंधक कार्यालयात फ्लॅटचे 20 लाख रुपयांमध्ये रोहन जेटला आणि त्यांच्या पत्नीच्या नावे खरेदीखत करून दिले होते. फ्लॅटचे नोंदणी करिता भूमापन अधिकार्यांकडे फिर्यादी जेटला यांनी अर्ज केला होता. त्यानंतर सदरच्या सांज अपार्टमेंटमधील तिसर्या मजल्याची नोंद दिसून येत नसल्याने खरेदी मिळकतीबाबत खात्री करून नोंदीबाबत अर्ज करावा, असे भूमापन विभागाने पत्राद्वारे जेटला यांना कळवले होते. त्यावरून तिसरा मजला अनधिकृत असल्याचे जेटला यांच्या लक्षात आले. त्यानंतर जेटला यांनी 3 डिसेंबर 2021 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केला होता. या अर्जाच्या चौकशीत सांज अपार्टमेंटचा तिसरा मजला अनधिकृत असल्याचे महापालिकेने कळविले. बिल्डर आयुब खान याने सांज अपार्टमेंटचा तिसरा मजला अधिकृत आहे, असे सांगून फ्लॅट विक्रीद्वारे जेटला यांची वीस लाख रुपयांची फसवणूक केली आहे.