आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला अखेर यश
जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांचे सीना नदी पूर नियंत्रण रेषा फेरसर्व्हेक्षणाचे आदेश
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर शहरातून जाणार्या सीना नदीच्या पूर नियंत्रण रेषेचे चुकिचे सर्वेक्षण झाल्याने त्याचा फटका सर्वसामान्य नगरकरांना बसला आहे. सीना नदीच्या पूर नियंत्रण रेषेचे फेरसर्व्हेक्षण होण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नुकतेच झालेल्या बैठकित पूर नियंत्रण रेषेचे फेरसर्व्हेक्षणाचे आदेश दिले आहेत. यामुळे सिनाकाठी राहत असलेल्या अनेक नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या असून, घरे बांधणे व इतर प्रकल्प उभारणीसाठी मंजूरी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे
नगर शहरातून वाहत असलेल्या नदीचे शहर हद्दीत एकूण लांबी सुमारे 14 किलोमीटर असून, शहराच्या मध्यवर्ती भागातून ही नदी वाहते. त्यामुळे शासनाच्या नियमानुसार सीना नदीचे पूर नियंत्रण रेषेचे हद्द सुमारे दीडशे ते पाचशे मीटर च्या दरम्यान करण्यात आलेली आहे. नदीलगत राहणार्या नागरिकांनी कुठल्याही प्रकारची बांधकामाची परवानगी मिळत नव्हती. नागरिकांनी सिना नदी लगत घेतलेले अनेक एनए प्लॉट पड आहे. तर काहींनी गरजेनूसार कुठलीही परवानगी न घेता बांधकाम केले. यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसुल देखील बुडाला आहे. शहरातील सुमारे 50 टक्के नागरिकांना या पूर नियंत्रण रेषा यांच्या प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आमदार जगताप यांनी शासन दरबारी पाठपुरावा केल्यामुळे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सीना नदी पूर नियंत्रण रेषेचे फेरसर्वेक्षणाचे आदेश दिले असून, त्यांनी सीना नदी खोलीकरण व रुंदीकरणासाठी लागणार्या निधीसाठी तातडीने अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश दिले आहे. लवकरात लवकर या अंदाजपत्रक सादर करावे, यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले आहे. याप्रकरणी काही महिन्यांपूर्वी जलसंपदा मंत्री जयंत पाटील शहरात आले असता त्यांच्यासह आमदार जगताप यांनी प्रत्यक्ष सीना नदी पूर नियंत्रण रेषेबाबत घटनास्थळी जाऊन पाहणी केली होती.
सध्याची सीना नदी पूर नियंत्रण रेषा
एमआयडीसी सह्याद्री दोन्ही बाजूने 200 मी.
बोल्हेगाव परिसरात मनमाड रस्त्याच्या बाजूने 150 मी, विरुध्द बाजूने 350 मी.
बालिकाश्रम रस्ता दोन्ही बाजूने 300 मी.
बागरोजा हडको भागात दिल्लीगेटच्या बाजूने 500 मी.
नेप्तीनाक्याच्या बाजूने 300 मी.
आयुर्वेद कॉलेज, काटवन खंडोबा परिसरात दोन्ही बाजूने 200 मी.
नवीन टिळक रस्ता व आनंदऋषी रुग्णालय परिसरात 350 मी.
विनायकनगर परिसरात एका बाजूने 100 मी. विरुध्द बाजूने 500 मी.
बुरुडगाव परिसरात दोन्ही बाजूने 150 मी.
अशा पध्दतीने निम्मे शहर या पूरनियंत्रण रेषेत आले आहे. एकंदरीत शहराच्या विकासाला ही पूरनियंत्रण रेषा बाधा ठरत आहे. ज्या ठिकाणी कधी सिना नदीचे पूर आले नाही, ते ठिकाणही यामध्ये अतर्भूत झाले आहे. पावसाळ्यामध्ये अनेकदा पूरस्थिती निर्माण झाली. परंतु हे पाणी शहराच्या कोणत्याही भागात घुसलेले नाही. या सर्व बाबी शासनासमोर निदर्शनास आनल्यामुळे पूरनियंत्रण रेषेच्या फेरसर्वेक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.