माणुसकीच्या अपघाती मृत्यूची 6 सप्टेंबरला गांधी मैदानातून अंत्ययात्रा
सैनिक समाज पार्टीचा पुढाकार
अहमदनगर (प्रतिनिधी)- अनेक तक्रारी, निवेदन व मागणी करुन देखील शहरातील खड्डेमय रस्त्यांची परिस्थिती सुधारत नसल्याने दररोज लहान-मोठे अपघात होत आहे. या अपघातात अनेक निष्पाप नागरिकांचा जीव जात आहे, काहींना अपंगत्व तर काहींना पाठीचा त्रास सुरु झालेला आहे. प्रशासनाच्या नाकर्त्यापणामुळे माणुसकीच मरण पावली असल्याचा आरोप सैनिक समाज पार्टीच्या वतीने करण्यात आला आहे. शासन-प्रशासनाला जाग आनण्यासाठी माणुसकीच्या अपघाती मृत्यूची अंत्ययात्रा 6 सप्टेंबर रोजी शहरातून काढली जाणार असल्याची माहिती सैनिक समाज पार्टीचे राज्याध्यक्ष अॅड. शिवाजी डमाळे व जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे यांनी दिली आहे.
ही अंत्ययात्रा संध्याकाळी 4 वाजता गांधी मैदान येथून निघणार आहे. लक्ष्मीबाई कारंजा, पटवर्धन चौक, गाडगीळ पटांगण मार्गे नालेगाव अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अंत्यसंस्कारानंतर माणुसकीला श्रद्धांजली वाहून महापालिका, जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकार्यांच्या नावाने शिमगा केला जाणार आहे. याबाबत मुख्यमंत्री यांना देखील निवेदन पाठविण्यात आले आहे.
शहरातील नागरिकांना खड्डेमय रस्त्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत असून, अनेक अपघात घडत आहे. संत अण्णा चर्च ते गंज बजार, चांद सुलताना हायस्कूल ते स्वामी विवेकानंत चौक या रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. अशाप्रकारे शहरातील सर्व प्रभागात खड्डेमय रस्त्यांचा त्रास जनतेला सहन करावा लागत आहे. या रस्त्यांची तात्पुरती मलमपट्टी केली जात असली तरी, ते पावसाने वाहून जात आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे वाहतुक कोंडीचा त्रासही जनतेला सहन करावा लागत आहे.
महिला व विद्यार्थ्यांना रस्त्यावर जाताना मोठ्या हालअपेष्टा सोसाव्या लागत आहे. अत्यंत दयनीय अवस्था नगरच्या रस्त्यांची झाली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. रस्त्याचे काम करताना चांगल्या ठेकेदारामार्फत करुन कामाची गुणवत्ता तपासून काम व्हावे, खराब झालेले रस्ते त्वरीत दुरुस्ती करण्याची मागणी सैनिक समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.