अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनी निर्माण मजदुर संघटना अहमदनगर शाखेची स्थापना
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात अनेक वर्षापासून असंघटित असलेल्या मजूर अड्डयावरील (तुरुंग) बांधकाम कामगारांच्या संघटनेची पायाभरणी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनी झाली. जुन्या महापालिके समोर कामाच्या प्रतिक्षेत थांबणार्या सर्व मजूर वर्गांनी एकत्र येऊन निर्माण मजदुर संघटना अहमदनगर शाखेची स्थापना केली. भारत माता की जय…. वंदे मातरमच्या घोषणा देत श्रमिक कामगारांनी हातात तिरंगे ध्वज घेऊन एकजुटीचा नारा दिला.
निर्माण मजदुर संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश आडबल्ले व शाखा अध्यक्ष उत्तम भिंगारदिवे यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी शाखा उपाध्यक्ष संभाजी भिंगारदिवे, सचिव सुभाष साठे, सहसचिव भगवान नेटके, खजिनदार सुनिल साळवे, सुदाम वागस्कर, हौसाराव हराळ, दिपक गायकवाड, सचिन देवकर, राजू सुराणा, संघटक नवनाथ गायकवाड, नागेश भिंगारदिवे, अंबादास मदने, इरफान सय्यद, गणेश नेटके, राहुल गायकवाड, बबन दिवे, अशोक चव्हाण, राम वाघमारे, महिलाध्यक्षा पिराबाई शेळके, मिरा पवार, राणी मारवणकर आदी मजदुर संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष रमेश आडबल्ले म्हणाले की, शहरात अनेक वर्षापासून असलेल्या मजूर अड्डयावरील (तुरुंग) बांधकाम कामगारांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, होणारा अन्याय थांबावा, कुटुंबाचे विविध प्रश्न सुटावे, कामाला सुरक्षितता प्राप्त होण्याच्या उद्देशाने तुरुंगावरील कामगारांना संघटित करण्यात आले आहे. कित्येक वर्षापासून असंघटित असलेल्या या बांधकाम कामगारांना संघटित करुन त्यांना न्याय, हक्क देण्याचे काम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शाखा अध्यक्ष उत्तम भिंगारदिवे यांनी संघटनेमुळे मजूर अड्डयावरील असलेला विस्कळीतपणा, असंघटितपणा दूर होणार आहे. बिनभरोश्याच्या अड्डयावरील कामगारांना विश्वास देण्याचे काम संघटना करणार आहे. अनेक कामगारांची शासन दरबारी नोंद नसून, त्यांची नोंद होण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मजदूर संघटनेचे राज्याध्यक्ष मधुकांत पथारिया यांनी नवीन पदाधिकार्यांना शुभेच्छा देऊन कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द राहण्याचे आवाहन केले.
मजूर अड्डयावरील (तुरुंग) बांधकाम कामगारांच्या संघटनेच्या उद्घाटनाप्रसंगी शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम व नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी भेट देऊन शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. संघटनेचे सल्लागार उजेर सय्यद व इम्रान पठाण यांनी पदाधिकार्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.