महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर मुक सत्याग्रह
अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी झालेल्या हल्ल्याचा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. शहरातील वाडियापार्क क्रीडा संकुल येथील महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यासमोर मुक सत्याग्रह करण्यात आला. आंदोलकांनी तोंडाला काळ्या मुखपट्टया तर दंडाला काळ्या रेबीन बांधून या घटनेचा निषेध व्यक्त केला.
आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, नगरसेवक प्रकाश भागानगरे, महिला शहर जिल्हाध्यक्षा रेशमा आठरे, युवती शहराध्यक्षा अंजली आव्हाड, अशोक बाबर, ओबीसी सेलचे अमित खामकर, वकिल सेलचे अॅड. योगेश नेमाणे, अजय दिघे, फारुक रंगरेज, अब्दुल खोकर, लहू कराळे, गणेश बोरुडे, अनिकेत येमूल, अभिजीत ढाकणे, आकाश शहाणे, शशीकांत आठरे, मारुती पवार, दिपक खेडकर, नितीन लिगडे, अलिशा गर्जे, शितल गाडे, उषा सोनटक्के, शितल राऊत, सुनिता पाचारणे, सुजाता दिवटे, सुनिता गुगळे, योगिता कुडीया, सुप्रिया काळे, संतोष हजारे, मनोज आंबेकर, लकी खुबचंदानी, यश लिगडे, सुभाष लोंढे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
देशाच्या राजकारणातील ज्येष्ठ व्यक्तीच्या घरावर आंदोलनाच्या नावाखाली भ्याड हल्ला करण्यात आलेला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला आणि लोकशाही विरोधात झालेले हे कृत्य आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर एस.टी. कर्मचार्यांच्या लोकांनी पेढे वाटून आनंद साजरा केला, तर दुसरीकडे एसटी कर्मचार्यांच्या काही आंदोलकांनी शरद पवार यांच्या घरावर दगडफेक केली. शरद पवार यांचे कुटुंबीय घरात असताना आंदोलकांना चिथावनी देऊन नियोजनबद्ध हल्ला करण्यात आला आहे. हे चुकीचे राजकारण खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला हे लोकशाहीच्या विरोधात आहे. ते देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठे योगदान देत असून, कर्मचारी हिताचे निर्णय घेऊन त्यांनी सर्वात जास्त कामे केलेली आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी कामगारांसाठी केंद्राने पारीत केलेला कोणताही कायदा महाराष्ट्रात जसाच्यातसा राबविण्याची तरतुद केलेली आहे. कामगारांना त्यांनी नेहमीच न्याय देण्याचे काम केले. मात्र चुकीचे राजकारण करुन एका एसटी कामगार नेत्याच्या चिथावणी वरुन ज्येष्ठ नेत्याच्या घरावर हल्ला करणे निषेधार्ह बाब असल्याचे त्यांनी सांगितले.