जबाबदार तलाठी व मंडळाधिकारी यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्यान्वये कारवाई करण्याची मागणी
अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- वीस वर्षापूर्वी न्यायालयाचे आदेश होऊनही शेतकर्याच्या नावावर 7/12 ची नोंद न लावणार्या पारनेर तालुक्यातील जबाबदार तलाठी व मंडळाधिकारी यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्यान्वये कारवाई करुन त्यांचे निलंबन करण्याची व सदर शेतकर्याच्या नावावर 7/12 ची नोंद लावण्याची मागणी अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील बाबाजी गायकवाड यांच्या नावावर 7/12 नोंद होण्याबाबत 15 मार्च 2002 रोजी न्यायालयाचे आदेश होऊनही आजपर्यंत नोंद जाणीवपूर्वक करण्यात आलेली नाही. ते न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नोंद होण्याबाबत सन 2013 पासून तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वारंवार हेलपाटे मारत आहे. जाणीवपूर्वक सातबारावर त्यांची नोंद घेतली जात नाही. जबाबदार तलाठी व मंडळाधिकारी अर्थपूर्ण हेतू साधण्यासाठी जाणीवपूर्वक दिरंगाई करत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
न्याय मागणार्या शेतकरीच्या बाजूने न्याय होवूनही त्याची अंमलबजावणी मागील वीस वर्षापासून करण्यात आलेली नसून, न्यायालयाच्या निर्णयाचे अवमान करण्यात आला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. शेतकर्याची 7/12 ची नोंद घेण्यास वर्षानुवर्ष दिरंगाई करणार्या तलाठी व मंडळाधिकारी यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्यान्वये कारवाई करुन त्यांचे निलंबन करण्याची मागणी समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व तक्रारदार बाबाजी गायकवाड यांनी केली आहे. एक महिन्याच्या आत सदर प्रकरणी निर्णय न झाल्यास नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.