वडगाव गुप्ता येथील पिडीत महिलेने दिले पोलीस अधीक्षकांना निवेदन
पोलीस कर्मचारी उडवाउडवीचे उत्तरे देऊन आरोपींना पाठिशी घालत असल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- विनयभंग व पती, सासरे व भाया यांना जबर मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चुलत सासरे व त्यांच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल झालेला असताना, सदर आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन वडगाव गुप्ता येथील पिडीत महिलेने पोलीस अधीक्षकांना दिले. तर याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी उडवाउडवीचे उत्तरे देऊन आरोपींना पाठिशी घालत असल्याचा आरोप सदर महिलेने केला आहे.
पिडीत महिला 23 ऑगस्ट रोजी सकाळी गाईला चारा आणण्यासाठी शेतात जात असताना सागर दत्तात्रय शेवाळे याने मागून येऊन विनयभंग केला. आरडाओरड केल्यानंतर पती वाचविण्यासाठी आले असताना आरोपीचे आई व वडिलांनी लाकडी दांडक्याने त्यांना मारहाण केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यास गेल्यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालयातून मेडिकल करुन घेण्याचे सांगितले. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर आरोपींनी पोलीस स्टेशनला जाऊन खोटा गुन्हा दाखल केला. त्या दिवशी लहान मुलाला ताप आल्याने घरी आल्यानंतर सासरे व भाया यांना आरोपींनी बेदम मारहाण केली. त्यांना डोक्यात मार लागून टाके पडले. पुन्हा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यास गेल्यानंतर पोलीसांनी गुन्हा दाखल करुन न घेता उडवाउडवीचे उत्तर दिले असल्याचा आरोप सदर महिलेने केला आहे.
काही वेळाने एमआयडीसी पोलीस स्टेशनला दत्तात्रय शेवाळे, संभाजी शेवाळे, आकाश शेवाळे, सागर शेवाळे, कांता शेवाळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या मारहाणीत जीवे मारण्याचा प्रयत्न होऊनही पोलीसांनी आरोपींवर 307 कलम लावले नाही. तसेच 20 ऑगस्ट रोजी देखील गाईला चारा आणण्यासाठी शेतात जात असताना आरोपींनी शिवीगाळ व धक्काबुकी केली होती. याप्रकरणी पोलीसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. यावेळीच पोलीसांनी आरोपींना योग्य कारवाई केली असती, तर हा प्रकार टाळता आला असता, असे पिडीत महिलेने म्हंटले आहे. तरी आरोपींपासून जीवितास धोका असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.