• Wed. Dec 11th, 2024

वाणीनगरला विवाहितेला आईसह घरात बंद करुन सासरच्या मंडळींनी केली जबर मारहाण

ByMirror

May 11, 2022

दिराने विनयभंग केल्याची विवाहितेची तक्रार
पतीसह सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल

अहमदनगर (प्रतिनिधी)- पती बाहेर असताना दिराने विनयभंग केल्यानंतर सदर प्रकरणी आई-वडिलांना चर्चेसाठी बोलवल्यानंतर घरातील हॉलचा दरवाजा आतून लाऊन पती व सासरच्या मंडळींनी विवाहितेसह तिच्या आईला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळी विरोधात पिडीत विवाहितेच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 9 मे रोजी वाणी नगर, पाईपलाइन रोड येथे ही घटना घडली.


पिडीत विवाहितेचे पती ऋषीकेश चव्हाण छायाचित्रकार आहेत. 8 मे रोजी विवाहितेचे पती कामानिमित्त पुणे येथे गेले असताना, सायंकाळी घरी एकटी असल्याचा फायदा घेत त्यांचा दिर चिराग चव्हाण याने तिला जवळ ओढून विनयभंग केला. घाबरलेल्या अवस्थेत विवाहित महिला रासणेनगर, सावेडी येथील आईच्या घरी माहेरी आली व घडलेला प्रकार सांगितला. पतीला हा प्रकार सांगण्यासाठी फोन केला असता, त्याचा फोन बंद आला. दुसर्‍या दिवशी सकाळी 9 मे रोजी घडलेला प्रकार विवाहितेने तिच्या पतीला सांगून दिर विरोधात पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले. यावर पतीने एकत्र चर्चा करण्यासाठी घरी बोलावले. विवाहित महिला पतीच्या घरी गेली. दुपारी पती आल्यानंतर त्याने विवाहितेच्या आई-वडिलांना बोलावून घेतले. त्यानंतर चर्चेसाठी सासू-सासरे व दीर तेथे आले. हॉलमध्ये सर्व एकत्र आल्यानंतर पतीने घराचा दरवाजा आतून लाऊन घेतला पत्नीला व तिच्या आईला शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. सासूने देखील विवाहितेच्या आईचे केस ओढून मारहाण केली.


या प्रकरणाची मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केल्याचे कळताच सासूने मोबाईल हिसकावून जमीनीवर आपटला. त्यानंतर पती, सासू, सासरे व दीर यांनी मला व आईला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत पिडीत विवाहितेने म्हंटले आहे. तिच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस स्टेशनला 9 मे रोजी सासू ज्योती चव्हाण, सासरे रमेश चव्हाण, दिर चिराग चव्हाण व पती ऋषीकेश चव्हाण यांच्यावर भा.द.वि. कलम 354, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *