चर्मकार संघर्ष समितीने घेतली पोलीस अधीक्षकांची भेट
अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची गुरुवारी (दि.24 फेब्रुवारी) भेट घेऊन शेवगाव तालुक्यातील वरुर येथे तेलोरे कुटुंबीयांवर झालेल्या हल्ल्यातील गावगुंड आरोपींना तात्काळ अटक करुन, पिडीत कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याची निवेदनाद्वारे मागणी केली. यावेळी समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी साळवे, उपाध्यक्ष बाबासाहेब तेलोरे, जिल्हा सचिव विठ्ठल जयकर, रामकिसन साळवे, जिल्हा युवक अध्यक्षअभिजीत खरात, महिला संघटक क्रांती गायकवाड, शशीकला झरेकर, महिला जिल्हाध्यक्षा मिनाताई गायकवाड, वंदना गायकवाड, गीताताई कांबळे, नंदकुमार गायकवाड आदी उपस्थित होते.
शेवगाव तालुक्यातील वरुर या गावात 18 फेब्रुवारी रोजी सकाळी चर्मकार कुटुंबातील मोलमजुरी करणारे गोरख मारुती तेलोरे यांच्या कुटुंबावर गावातील दादासाहेब एकनाथ जाधव व त्याच्या गावगुंड साथीदारांनी हल्ला केला. यामध्ये तेलोरे कुटुंबीयांना जबर मारहाण करण्यात आली. तसेच त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्व आरोपी मोकाट आहे. तेलोरे यांच्या परिवारावर गावगुंडांचे हितसंबध असणारे व्यक्ती गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव आनत आहे. तसेच त्यांच्या परिवाराला खोटे गुन्ह्यात अडकविण्याच्या धमक्या दिल्या जात आहे. या प्रकरणात काही पोलीस कर्मचारी काही आर्थिक देवाण-घेवाण करुन गुन्हा मागे घेण्यासाठी तेलोरे कुटुंबीयांवर दबाव आनत असून, याप्रकरणी कोणाला न सांगण्यासाठी त्यांना धमकाविण्यात येत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. तेलोरे कुटुंबीयांना मारहाण करणार्या आरोपींना तात्काळ अटक व्हावी, त्यांच्या परिवाराला पोलीस संरक्षण द्यावे, तेलोरे यांना गुन्हा मागे घेण्यास दबाव आनणारे पोलीसांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गुन्हेगारांना लवकरच अटक करण्याबाबत शेवगाव परिक्षेत्राचे पोलीस उपाधीक्षक यांना सूचना केल्या. तर फिर्यादीवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्या संदर्भात तपास करण्याचे व तेलोरे कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याचे मान्य केले असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष साळवे यांनी दिली.