शिक्षक परिषदेची मागणी
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यात वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षणात तांत्रिक अडचणीमुळे हजारो प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणापासून वंचित असल्याने प्रशिक्षण कालावधीत वाढ करण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने मुंबई विभाग अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाह शिवनाथ दराडे, कोषाध्यक्ष गणेश नाकती यांनी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (पुणे) संचालकांना दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
एससीइआरटी मार्फत राज्यातील शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने आयोजित केलेले आहे. या प्रशिक्षणासाठी राज्यातील 94 हजार शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी आवश्यक ई-मेल आयडी, पासवर्ड अनेकांना मिळालेले नाहीत. त्यामुळे अजूनही 2 हजार 676 प्रशिक्षणार्थी अद्यापि प्रशिक्षणापासून वंचित राहिल्याचे उघडकीस आले आहे. तसेच काही प्रशिक्षकांना आपल्या प्रशिक्षणात बदल करायचा आहे. शाळेतील दैनंदिन कामकाज सुरू असून, शाळेत काही ठिकाणी जाण्या-येण्यासाठी मोठ्या प्रमाणात वेळ लागतो. हे प्रशिक्षण मराठीत असल्याने उर्दू, गुजराती, कन्नड, तेलगू, तामिळ, इंग्रजी भाषेच्या शिक्षकांना मराठी भाषेत समजण्यास व स्वाध्याय लिहिणे कमी कालावधी शक्य होत नाही. त्यामुळे अनेक शिक्षकांचे प्रशिक्षण अपूर्ण राहण्याची दाट शक्यता असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षणाचा हा प्रश्न गांभीर्याने घेऊन संबंधित प्रशिक्षणार्थींचा विषय मार्गी लावून, तालुकास्तरावर मार्गदर्शकांची सोय करून अडचणी सोडविण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर स्वाध्याय व पीपीटी यासाठी दिवाळी सुट्टीपर्यंतचा कालावधी वाढवून द्यावा तसेच स्वाध्याय संख्या कमी करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.