पर्यावरण संवर्धन व प्रदुषण मुक्तीसाठी अहमदनगर वकील संघाचा पुढाकार
नव्या पिढीला दिवंगत वकिलांचे ऐतिहासिक कार्य ज्ञात होण्यासाठी छापली जाणार स्मरणिका
अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धन व प्रदुषण मुक्तीसाठी अहमदनगर वकील संघाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला असून, वकील सभासदांना बँकेच्या अर्थसहाय्यातून इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध करून देण्यासाठी योजना राबविण्यात येणार आहे. वकील पर्यावरणाचा खरा मित्र या उपक्रमांतर्गत ही योजना कार्यान्वीत होण्यासाठी वकील संघ प्रयत्नशील असल्याची माहिती वकील संघाचे अध्यक्ष अॅड. अनिल सरोदे यांनी दिली.
वकील पर्यावरणाचा खरा मित्र या उपक्रमांतर्गत न्यायालयाच्या आवारात इलेक्ट्रिक स्कूटरची वकील मंडळींनी शनिवारी (दि.5 मार्च) पहाणी केली. दिवसंदिवस पेट्रोल, डिझेलची दरवाढ होत असून, वाहनांमुळे प्रदुषण देखील वाढत आहे. रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे भारतात पेट्रोलचे भाव लवकरच दीडशे रुपया पर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यातून महागाईचा भडका निर्माण होणार आहे. वाहनांच्या प्रदुषणामुळे ग्लोबल वार्मिंगचे दुष्परिणाम मनुष्याला भोगावे लागत आहे. वकील संघाने पुढाकार घेऊन किमान दोनशे वकील सभासदांना बँकेच्या अर्थसहाय्यातून इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध करून देण्याची योजना आखण्यात आली आहे. यासाठी ई स्कूटरच्या कंपन्यांशी चर्चा सुरु असून, लवकरच ही योजना कार्यान्वीत केली जाणार असल्याचे अॅड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे.
शहरात ई स्कूटरचा वापर वाढल्यास प्रदुषणमुक्त शहर होण्यास मदत होणार आहे. यामध्ये वकीलांचे मोठे योगदान राहणार आहे. तसेच वकील वर्गाने आपल्या घरावर सोलर सिस्टिमचा वापर करावा असा आग्रह देखील धरला जाणार आहे. पर्यावरणाचे प्रश्न गांभीर्य जनतेला समजण्यासाठी वकील मंडळी समाजासमोर एक नवीन आदर्श निर्माण करणार असल्याचे उपाध्यक्ष अॅड. संदीप वांढेकर यांनी सांगितले.
तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून वकील संघाच्या माध्यमातून गेल्या शंभर वर्षात अमदनगर कोर्टात काम केलेल्या दिवंगत वकिलांची स्मरणिका अॅड. नरेश गुगळे यांच्या विशेष सहकार्याने छापली जाणार आहे. अहमदनगर जिल्हा न्यायालय जुने असून, गेल्या शंभर वर्षांच्या इतिहासात वकिलांनी वकिली करुन सामाजिक कार्यात देखील मोठे योगदान दिले आहे. अनेकांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता, तर काहींनी राष्ट्रीय राजकारणात सुद्धा विशेष कामगिरी केलेली आहे. त्यांच्या कार्याला उजाळा देऊन, नव्या पिढीला दिवंगत वकिलांचे ऐतिहासिक कार्य ज्ञात होण्यासाठी ही स्मरणिका छापली जाणार आहे. या स्मरणिकेसाठी दिवंगत वकिलांचे नातेवाईक आणि मित्रमंडळींनी दिवंगत वकिलांची माहिती व फोटो अहमदनगर बारच्या वाचनालयात जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वकील पर्यावरणाचा खरा मित्र व दिवंगत वकिलांच्या स्मरणिकेसाठी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. अनिल सरोदे, अॅड. किशोर देशपांडे, अॅड. नरेश गुगळे, अॅड. कारभारी गवळी, अॅड. बाळासाहेब पवार, अॅड. अशोक कोठारी, उपाध्यक्ष अॅड. संदीप वांढेकर, अॅड. भाऊ औसारकर, अॅड. सुभाष काकडे, अॅड. कृष्णा झावरे, अॅड. बाळासाहेब घुले, अॅड. सुजाता गुंदेचा, अॅड. संजय जव्हेरी आदी प्रयत्नशील आहेत. याबाबत वकील सदस्यांची लवकरच बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.