• Wed. Dec 11th, 2024

लोणी गावाचे लोणी पद्मश्री नामविस्तार करण्याचा पीपल्स हेल्पलाईनचा प्रस्ताव

ByMirror

Mar 22, 2022

राज्य सरकारकडे मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील लोणी येथे पहिला शेतकर्‍यांचा सहकारी साखर कारखाना उभा करुन पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व डॉ. धनंजय गाडगीळ यांनी देशात सहकाराची पायाभरणी केली. सहकाराने ग्रामीण भागाची मोठी प्रगती झाली. सहकाराची मुहुर्तमेढ रोवणार्‍यांच्या कार्याला सलाम म्हणून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात लोणी गावाचे लोणी पद्मश्री असे नामविस्तार करण्याचा प्रस्ताव पीपल्स हेल्पलाईन या संघटनेच्या वतीने ठेवण्यात आला आहे. हा प्रस्ताव शासनाने मंजूर करावा, अन्यथा जनतेच्या प्रजासत्ताकचा अधिकार वापरुन लोणी पद्मश्री जाहीर करण्याचा इशारा शासनाला देण्यात आला असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
भारतात सहकार अर्थव्यवस्था येण्यासाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व डॉ. धनंजय गाडगीळ यांनी आपल्या सहकार्याच्या मदतीने विशेष प्रयत्न केले. त्यातून शेतकर्‍यांचा लोणी येथे पहिला सहकारी साखर कारखाना उभा राहिला. दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या सहकार अर्थव्यवस्थेला विशेष पाठिंबा दिला होता. लोणी परिसरातील 40 ते 50 गावांमध्ये या साखार कारखान्यामुळे मोठी क्रांती झाली. ही क्रांती संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये पसरली गेली. सहकाराच्या माध्यमातून शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था समृद्ध करता येते, ही बाब पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रयत्नातून सिद्ध झाली. त्यामुळेच भारत सरकारने राष्ट्रपतींच्या हस्ते विठ्ठलराव विखे यांना पद्मश्री हा बहुमान दिला.
गेल्या वीस वर्षांमध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या अनेक भागात सहकारी चळवळीमध्ये भ्रष्टाचार आणि अनागोंदी निर्माण झाली आहे. त्यातून अनेक सहकारी साखर कारखाने व बँका मोडीत निघाल्या. गावाच्या पतसंस्थादेखील संस्था चालकांनी खाऊन टाकल्या. एकंदरीत देशात निर्माण झालेल्या सहकारी अर्थव्यवस्थेला ग्रहण लागले आहे. या प्रश्‍नामुळे ग्रामीण जनतेचा विकास खुंटत चालला असल्याचे म्हंटले आहे.
पुन्हा सहकार चळवळीचा नव्याने उदय होण्यासाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी केलेल्या कार्याची प्रेरणा मिळण्यासाठी लोणी चे पद्मश्री लोणी असे नामविस्तार करण्याचा प्रस्ताव संघटनेने ठेवला असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र सरकारने याबाबतीत पुढाकार घेऊन राहता तालुक्यातील लोणीचे लोणी पद्मश्री नामविस्तार करावे. याबाबत शासनाने काही सकारात्मक कारवाई न केल्यास व या नामविस्ताराला कोणाकडून काही एक विरोध नसल्यास 1 मे महाराष्ट्र दिनी लोणी पद्मश्री नामविस्तार जाहीर कले जाणार आहे. या प्रस्तावाचे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना पाठविण्यात आले आहे. या नामविस्तारासाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे, वीरबहादूर प्रजापती, प्रकाश थोरात, हिराबाई ग्यानप्पा, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, पै. नाना डोंगरे, जालिंदर बोरुडे, विजय भालसिंग, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल सुरम, अशोक भोसले प्रयत्नशील आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *