पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने स्विकार करण्याचा आग्रह
अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतात लोकशाही प्रजासत्ताक राबविण्यासाठी दि आर्ट ऑफ डिच्चू कावा प्रभावी असून, त्याचा स्विकार करण्याचा आग्रह पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने देण्यात आला आहे. तर डिच्चू कावा तंत्राच्या प्रसाराने लोकांमध्ये जागृती निर्माण होत असून, यामुळे भाडभ्रष्ट पुढारी व सरकारी कर्मचार्यांचे धाबे दणाणले असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
भारतात लोकशाही प्रजासत्ताक स्वीकारले गेले, त्याच बरोबर महात्मा गांधीजींची अहिंसा आणि सत्याग्रहाचे तत्व देखील स्वीकारण्यात आलेले आहे. त्यामुळे डिच्चू कावा फक्त अहिंसेच्या मार्गाने करता येतो. संसद, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी पाठवीत असताना मतदारांनी गुट्टलबाज आणि सत्तापेंढारी उमेदवार व पक्षांना डिच्चू कावा तंत्राद्वारे कायमचे दूर ठेवले पाहिजे. यासाठी दि आर्ट ऑफ डिच्चू कावा याला फार महत्त्व प्राप्त झाले असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
देशभरात काळे इंग्रजांचे राज्य पोसले जात आहे. नोकरशाहीवर मंत्री किंवा लोकप्रतिनिधींचा कोणताही धाक राहिलेला नाही. त्यामुळे स्वतंत्र्योत्तर काळात प्रजासत्ताकाऐवजी वेड्याबाभळीची शेती सुरू आहे. त्यामुळे गरिबी आणि बेकारी वाढत आहे. 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी शासन-प्रशासन मध्ये डिच्चू कावा तंत्राद्वारे कायद्याचे राज्य स्थापन केले. त्याची खर्याअर्थाने रयतेच्या राज्याची प्रचिती तमाम जनतेला त्यावेळी आली. कॉ. गोविंदराव पानसरे लिखित शिवाजी कोण होता? या पुस्तकातून शिवाजी महाराजांच्या डिच्चू कावा तंत्राची जाणीव खर्या अर्थाने होते. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा देणार्या आणि राज्य करू पाहणार्या लोकांकडे शिवाजी महाराजांचे काही एक गुण नाही. त्यामुळे दिल्लीपासून गल्लीपर्यंत भ्रष्टाचार, अनागोंदी, टोलवाटोलवी सुरू असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
देशात लोकशाही प्रजासत्ताक राबविण्यासाठी देशभरात कार्यरत असलेल्या 45 लाख वकिलांपैकी 20 टक्के वकिलांनी राष्ट्रीय मूलभूत कर्तव्य म्हणून, सध्याच्या व्यवस्थेमध्ये क्रांतिकारक बदल घडवून आणण्यासाठी पर्यायी व्यवस्था क्रांती लढ्यात सहभागी होण्याची गरज आहे. भ्रष्टाचार संपविण्यासाठी डिच्चू कावा आणि पर्यायी व्यवस्था देणार्या उन्नत शिवचेतना असणार्यांची गरज आहे. शिकलेल्या लोकांनी निवडणुकांपासून दूर जाणे पसंत केल्यामुळे आणि राजकारण गलिच्छ असल्याचा खोटा आरोप केल्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात अनेक मंत्री व राजकारणी भ्रष्टाचारामुळे जेल मध्ये जात असल्याचे अॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. दि आर्ट ऑफ डिच्चू कावा मोहिमेसाठी अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे, यमनाजी म्हस्के, वीरबहादूर प्रजापती, प्रकाश थोरात, हिराबाई ग्यानप्पा, अॅड. गवळी, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, पै. नाना डोंगरे, जालिंदर बोरुडे, विजय भालसिंग, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल सुरम, अशोक भोसले प्रयत्नशील आहेत.