तडजोड यशस्वी घडवून आनण्यासाठी नेमणार दि लॉरिस्टर
अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकन्यायालयातून सामंजस्याने तडजोड घडवून न्याय संस्थेवरील कामाचा ताण कमी होण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जन संसदेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. समाजातील मान्यता असलेल्या कार्यकर्त्यांना दावे किंवा खटल्यातील पक्षकारांची मनं वळविण्यासाठी आणि त्यांना तडजोडीस प्रवृत्त करण्यासाठी दि लॉरिस्टर म्हणून नियुक्त करुन लोकन्यायालयाच्या कामकाजात सहभागी करुन घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमना यांनी नुकतेच गुजरात उच्च न्यायालयात एडीआर तंत्राबाबत भाषण करताना आपले विचार मांडले आणि त्याबद्दल भगवान श्रीकृष्णांनी कौरव-पांडवांच्या वादात तडजोड घडवून आणण्यासाठी शिकस्त केली. परंतु कौरवांनी श्रीकृष्णाची शिष्टाई न मानल्यामुळे महाभारत घडले. आजही तडजोड न करण्यामुळे कोर्टातील दावे, खटले प्रलंबित राहतात. त्यातून दोन्ही पक्षकारांचे नुकसान होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारताचे सरन्यायाधीश यांनी लोक न्यायालय चळवळीमध्ये क्रांती घडवून आणन्याची भूमिका मांडली आहे. भारताच्या सरन्यायाधीशांचा संदेशामागील सत्य समजून घेऊन, समाजात आज सर्वत्र वावरणार्या हरहुन्नरी आणि सर्वकंष माहिती असणार्या कार्यकर्त्यांना लोक न्यायालयाच्या कामात सहभागी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे संघटनेच्या वतीने म्हंटले आहे.
या चळवळीचा भाग म्हणून पाथर्डी तालुक्यातील शंकरवाडी येथे झाडे, चेमटे, महाडीक या कुटुंबातील जमिनीचे न्यायालयात प्रलंबित असलेल्या वादाबाबत मिरी येथील पंचायत समिती सदस्य (पाथर्डी) राहुल दादा गवळी यांना दि लॉरिस्टर म्हणून नेमण्यात आले आहे. राहुल गवळी संबंधित पक्षकारांचे अतिशय जवळचे मित्र आहेत. मंगळवार दि.19 एप्रिल रोजी जिल्हा न्यायाधीश शेटे यांच्या समोर तडजोडीसाठी असलेल्या प्रकरणांमध्ये राहुल गवळी संबंधित सर्वांमध्ये एकवाक्यता निर्माण करून अनेक वर्षांचा शेतीचा वाद कायमचा मिटवणार आहे. राहुल गवळी यांना या प्रकरणात नक्कीच यश येणार आहे. यापुढे होणार्या जिल्हा तसेच तालुका न्यायालयामधील लोकन्यायालयात समाजातील मान्यता असणार्या व ज्यांचा समाजावर प्रभाव आहे, अशा कार्यकर्त्यांची मध्यस्थी स्वीकारण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
पक्षकारांचे मनात अनेक शंका असतात. आपली फसवणूक होणार नाही ना? याची भिती असते. त्याचबरोबर अहंकार व पूर्वग्रह दूषितपणामुळे न्यायालयातील प्रकरणे लांबली जातात. न्यायालयातील प्रकरणे लांबल्याने न्याय व्यवस्थेवर कामाचा ताण वाढतो. शहाणपणाच्या तडजोडीने प्रश्न मिटले पाहिजे. समाजातील लोकांचा लोक न्यायालयाकडून तडजोड घडवून आणण्यासाठी पहिल्यांदा अहमदनगर जिल्हा न्यायालयात असा अनोखा प्रयत्न केला जाणार असल्याचे अॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. अशी प्रकरणे तडजोडीने मिटवण्यासाठी संघटनेचे अॅड. गवळी, अशोक सब्बन, वीरबहादूर प्रजापती, प्रकाश थोरात, हिराबाई ग्यानप्पा, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, पै. नाना डोंगरे, जालिंदर बोरुडे, विजय भालसिंग, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.