प्रगतिशील लेखक संघाचे जिल्हा अधिवेशन संपन्न
अहमदनगर (प्रतिनिधी)- लेखक हा समाजातील सर्वात संवेदनशील व्यक्ती असून, साहित्यिकानी समाजातील सत्य, वास्तव व विद्रोह आपल्या लेखनातून मांडला पाहिजे, तसेच आपल्या लेखनाला सामाजिक प्रयोजन असावे असे मत प्रगतिशील लेखक संघाचे राज्य सरचिटणीस व कांदबरीकार राकेश वानखेडे यांनी व्यक्त केले.
शहरातील रहेमत सुलतान सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या प्रगतिशील लेखक संघाच्या जिल्हा अधिवेशनामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. मिलिंद कसबे होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ कवी प्रा. डॉ. संतोष पद्माकर पवार व डॉ. महेबूब सय्यद उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामदास वागस्कर यांनी केले. यावेळी त्यांनी या अधिवेशनाच्या आयोजनाबाबतची भूमिका मांडली.
साहित्यिक राकेश वानखेडे यांनी प्रगतिशील लेखक संघाचे कार्य व इतिहास यावर भाष्य केले. तर कवी संतोष पवार यांनी ग्रामीण, शहरी व लेखनातील देशीवाद यावर भाष्य केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद कसबे यांनी बहुजनवादी साहित्यातील सौंदर्यशास्त्र व त्याची पुनर्मांडणी यावर परखड मत व्यक्त केले. यावेळी दुसर्या सत्रात कवी संतोष पवार यांच्या अध्यक्षतेखाली नवोदित कवींचे कविसंमेलन पार पडले. यावेळी कॉ. बाबा आरगडे, कॉ. सुभाष लांडे, कॉ. स्मिता पानसरे, कॉ. बन्सी सातपुते, मनोज गुंदेचा, राजेंद्र गांधी, संजय झिंजे, धनंजय कानगुडे, डॉ. कमर सरूर, आबिद खान, संध्या मेढे, प्रा. शर्मिला गोसावी, कवी ऋता ठाकूर, डॉ. बापू चंदनशिवे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास घुटे, अजय कांबळे व सुहास तरंगे यांनी केले. आभार स्मिता पानसरे यांनी मानले.